राज्यसभेत भाजप खासदारांच्या अनुपस्थितीबद्दल पंतप्रधानांकडून नाराजी व्यक्त
नवी दिल्ली /प्रतिनिधी
राज्यसभेत भाजप खासदारांच्या अनुपस्थितीबद्दल पंतप्रधान मोदींनी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत याबद्दल नाराजी व्यक्त करत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांना विधेयक मंजूर आणि काल मतदान करताना सभागृहात उपस्थित नसलेल्या खासदारांची यादी मागवण्यास सांगितले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत भाजप खासदारांच्या अनुपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सोमवारी सभागृहात अनुपस्थित राहिलेल्या सदस्यांची यादी मागितली आहे. सूत्रांनी सांगितले की, मंगळवारी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना मोदींनी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांना मतदानाच्या वेळी सभागृहात उपस्थित नसलेल्यांचा तपशील देण्यास सांगितले.
सोमवारी राज्यसभेत संक्षिप्त चर्चेनंतर, विरोधी सदस्यांनी केलेल्या गोंधळादरम्यान न्यायाधिकरण सुधारणा विधेयक, २०२१ मंजूर करण्यात आले. या विधेयकात चित्रपट कायदा, सीमाशुल्क कायदा, व्यापार चिन्ह कायदा यासह अनेक कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. विरोधकांनी हे विधेयक निवड समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव दिला आणि नंतर त्यावर मत देण्याची मागणी केली. तथापि, सभागृहाने या कालावधीत विरोधकांच्या प्रस्तावाला ७९ मतांनी नाकारले. भाजपकडे सध्या राज्यसभेत एकूण ९४ सदस्य आहेत.