उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनीही घेतली प्रत्यक्ष भेट
प्रतिनिधी / पणजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरुन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपादभाऊ नाईक यांच्या प्रकृतीची चौकशी केली. काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा, असे सांगितले. दोघांचेही फोनवर काही मिनिटे संभाषणही झाले. उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात जाऊन नाईक यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि विचारपूस केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व गोमेकॉचे डिन डॉ. शिवानंद बांदेकर हे यावेळी त्यांच्यासमवेत होते.
नाईक यांचे ओएसडी सूरज नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी मोदी यांनी नाईक यांना थेट फोन लावून त्यांच्याकडे काही मिनिटे बोलणी केली तसेच त्यांचे सांत्वनही केले. नाईक यांच्यावरील उपचाराची मोदी यांनी माहिती घेतली आणि गरज भासली तर वैद्यकीय मदत देण्याची तयारी दर्शविली. नायडू यांनीही नाईक यांच्याकडे थोडक्यात चर्चा केली. लवकर बरे व्हा आणि काळजी घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
श्रीपादभाऊंच्या प्रकृतीत सुधारणा दरम्यान, डॉ. सावंत व डॉ. बांदेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीपादभाऊंच्या प्रकृतीत दिवसेंदिवस मोठय़ा प्रमाणात सुधारणा होत आहे. त्यांचे रोजचे खाणे – पिणे आता सुरु करण्यात आले असून त्यांच्यावर योग्य ते उपचार चालू आहेत. त्यांना इतरत्र किंवा दिल्ली येथील ‘एम्स’मध्ये नेण्याची गरज नाही. त्यांच्या सर्व चाचण्यांचे अहवाल चांगले येत असून त्यात सध्या तरी चिंता करण्यासारखे काही नाही. पत्नीच्या निधनाची बातमी त्यांना सांगताच ते भावूक झाले होते. तथापि, कालांतराने ते आता ठिक आहेत, असे सांगण्यात आले.