- पंतप्रधान पणजीत हुतात्म्यांना वाहणार आदरांजली
- डॉ. श्यामाप्रसाद स्टेडियमवर पंतप्रधानांची जाहीरसभा
- ‘ऑपरेश विजय’चे योद्धे, स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान
- भारतीय सशस्त्रदलांच्या स्मरणार्थ विशेष टपाल प्रकाशन
- सर्वोत्कृष्ट पंचायत, पालिका, स्वयंपूर्ण मित्र पुरस्कार
- तालुका, पालिका, ग्रामपातळीवरही विशेष कार्यक्रम
प्रतिनिधी /पणजी
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि गोवा मुक्तीच्या हीरकमहोत्सवी वर्षपूर्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवार 19 डिसेंबर रोजी गोव्यात दाखल होत आहेत. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, आमदार बाबूश मोन्सेरात यांची उपस्थिती होती.
तालुका, पालिका, ग्रामपातळीवर कार्यक्रम
सकाळच्या सत्रात नियोजित वेळापत्रकानुसार प्रत्येक तालुक्यात ध्वजारोहण व अन्य कार्यक्रम होतील. त्यावेळी प्रत्येक तालुक्यात संबंधित भागाचे मंत्री उपस्थित राहतील. मोठय़ा प्रमाणात स्थानिकांना या कार्यक्रमांत सहभागी करून घेण्यात येतील. पालिका आणि ग्रामपातळीवरही कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पंतप्रधान हुतात्म्यांना वाहणार आदरांजली
हीरकमहोत्सवी वर्षाच्या समारोप सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यानुसार दुपारी 1.30 वाजता दाबोळी येथे हंसा तळावर त्यांचे आगमन होईल. तेथून ते गोवा विद्यापीठ हॅलिपॅडवर उतरतील. दुपारी 2 वाजता ताळगावमार्गे पणजीतील आझाद मैदानावर येऊन हुतात्मा स्मारकास पुष्पांजली अर्पण करुन गोवा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांन अभिवादन करणार आहेत.
नौदल परेड, हवाई कवायतींचा नजराणा
आझाद मैदानावरुन पंतप्रधान मिरामार येथे जातील. तेथे आमदार बाबूश मोन्सेरात त्यांचे स्वागत करतील. त्यानंतर दुपारी 2 वाजता राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पंतप्रधान मिरामार समुद्रकिनारी होणाऱया नौदल परेड आणि हवाई उड्डाण कवायतींच्या (फ्लाय पास्ट) 25 मीनिटांच्या कार्यक्रमात सहभागी होतील. नेव्ही आणि डिफेन्स यांच्यातर्फे प्रथमच अशा प्रकारचा कार्यक्रम गोव्यात होत आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असेल. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
डॉ. श्यामाप्रसाद स्टेडियमवर जाहीरसभा
सायंकाळी 4.30 वाजता डॉ. श्यामाप्रसाद मुख्यर्जी स्टेडियमवर पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा होईल. त्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. या सभेसाठी दुपारी 1.30 पर्यंतच पासधारकांनाच प्रवेश देण्यात येईल. वंदे मातरमने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर पारंपरिक गिताने पंतप्रधानांचे स्वागत व सन्मान करण्यात येईल. मुख्यमंत्री त्यांचे स्वागत करतील.
‘ऑपरेश विजय’चे योद्धे, स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार
जाहीरसभेवेळी गोवा मुक्तीसंग्रामावर आधारित लघुपट दाखविण्यात येईल. त्यानंतर स्वातंत्र्यसैनिक आणि ’ऑपरेशन विजय’ मधील योद्यांचा पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल. त्यासाठी सर्व हयात स्वातंत्र्यसैनिकांना निमंत्रणे पाठविण्यात आली असून कार्यक्रमस्थळी त्यांच्यासाठी खास आसनव्यवस्थाही करण्यात आली आहे.
अनेक प्रकल्पांचे प्रंतप्रधान करणार उद्घाटन
नूतनीकरण केलेले अग्वाद किल्ला कारागृह संग्राहलय, गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी ब्लॉक, न्यू साऊथ गोवा जिल्हा रुग्णालय, मोपा विमानतळावरील हवाई कौशल्य विकास केंद्र (एव्हिएशन स्किल डेव्हलपमेंट सेंटर) आणि दाबोळी-न्हावेली, मुरगांव येथील गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन यासह अनेक विकास प्रकल्पांचे पंतप्रधान उद्घाटन करतील. त्यानंतर बार कौन्सिल ऑफ इंडिया ट्रस्टच्या इंडिया इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लीगल एज्युकेशन अँड रिसर्चचीही ते पायाभरणी करतील.
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत दवर्ली-नावेली, मडगाव येथे गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन सुमारे 16 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे. दवर्ली, नेसाई, नावेली, आके-बायश या गावांना अखंडित वीज पुरवठा करेल.
भारतीय सशस्त्रदलाच्या स्मरणार्थ विशेष टपाल
गोव्याला पोर्तुगीज राजवटीतून मुक्त करणाऱया भारतीय सशस्त्र दलांच्या स्मरणार्थ पंतप्रधान एक विशेष टपाल आणि शिक्का देखील जारी करतील. त्याशिवाय गोवा मुक्ती चळवळीत केलेल्या महान बलिदानाला अभिवादन करणाऱया पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाचे चित्रण करणाऱया ’माय स्टॅम्प’चेही प्रकाशन पंतप्रधान करणार आहेत. गोवा मुक्ती संग्रामातील विविध घटनांच्या चित्रांचा कोलाज दाखवणारे ’मेघदूत पोस्ट कार्ड’ यावेळी पंतप्रधानांना सादर केले जाणार आहे.
विविध पुरस्कारांचे वितरण
सर्वोत्कृष्ट पंचायत, नगरपालिका, स्वयंपूर्ण मित्र आणि स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमाच्या लाभार्थ्यांना पंतप्रधान पुरस्कारांचे वितरण करतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.