मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : राष्ट्रीय युवा संसदेत युवकांना मार्गदर्शन
प्रतिनिधी /पणजी
नवीन भारताच्या निर्मितीसाठी गोव्यासह देशातील तरुणांचे योगदान मोलाचे असून अखंडित भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न युवक पूर्ण करतील, त्यासाठी युवकांनी कंबर कसावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. बांबोळी येथील शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये राष्ट्रीय युवा संसदेचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
गोवा राज्य सरकारने जनकल्याणासाठी 210 सरकारी योजना आखल्या असून ऑनलाईन पद्धतीने 157 सेवा देण्यात येत आहेत. दर्जेदार शैक्षणिक प्रकल्प गोव्यात आणून राज्य शिक्षण हब करण्याचा इरादा आहे. व्यवसाय, उद्योगांसह युवकांसाठी मोठय़ा प्रमाणात रोजगार तयार करण्यात येत असून त्याचा लाभ युवकांना मिळत आहे. सीएम फेलोशिप रोजगार योजनेस चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा डॉ. सावंत यांनी केला.
विद्यार्थ्यांना विविध सवलती : बाबू आजगावकर
क्रीडामंत्री मनोहर आजगावकर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच खेळांसाठी विविध सवलती सुरु केल्या असून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीयस्तरावर खेळाडू तयार करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. तसेच क्रीडा धोरणही निश्चित करण्यात आले असून त्याचा लाभ ग्रामीण शहरी भागातील विद्यार्थ्यांना होत असल्याचे ते म्हणाले.
गोव्यासह देशाचे भवितव्य घडणार : पाटणेकर
सभापती राजेश पाटणेकर म्हणाले की, राष्ट्रीय युवा संसदेमुळे गोव्यासह देशाचे भवितव्य घडणार आहे. ही संसद गोव्याला, देशाला योग्य मार्गाने पुढे नेण्यासाठी उपयोगी पडणार आहे. देशातील लोकशाही सशक्त होण्यासाठी युवाशक्तीची भूमिका फार महत्त्वाची आहे, असेही त्यांनी नमूद केले.
सर्वश्री राहुल कराड, जयंत सहस्रबुद्धे, शरद पोंक्षे, नुपूर शर्मा, सुनिता दुग्गल, प्रवीण साठे हे मान्यवर त्यावेळी उपस्थित होते. संसदेत अनेक युवकांचा सत्कार करण्यात आला. प्रा. गौतम बापट, सुभाष जाण, पौर्णिमा बागची यांनी सूत्रसंचालन केले.