प्रतिनिधी / सातारा :
घरगुती गॅसची दरवाढ केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने रजिस्टर पोस्टाने रजिस्टर शेण्याच्या गोवऱ्या चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शनिवारी पाठवण्यात आल्या. सातारा पोस्ट कार्यालयाबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या विरोधाच्या घोषणाही देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा संमिद्रा जाधव, संपर्कप्रमुख कुसूम भोसले, उपाध्यक्ष नलिनी जाधव, कोरेगाव विधानसभा अध्यक्ष संजना जगदाळे, उषा पाटील, रशीदा शेख आदी उपस्थित होते.
त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या आडमुठेपणामुळे दिवसेंदिवस होणाऱ्या गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. केंद्र सरकारच्या विरोधात भयकंर असंतोष आहे. घरगुती गॅसच्या किंमतीत मोठी वाढ झाली. केंद्र शासनाचे गणित सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. त्यांना ही दरवाढ जीव नकोसा करणारी आहे. त्यामुळे हे पाऊल उचलावे लागत आहे. केंद्र सरकारने सामान्य जनतेच्या सामान्य अपेक्षाही पूर्ण करु शकत नाही. वारंवार होणाऱ्या घरगुती वापराच्या गॅसच्या किमीत वाढीवर सरकारचे बिलकुल नियंत्रण नाही. त्यामुळे सातारा जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून पंतप्रधानांना शेणाच्या गोवऱ्या पाठून निषेध करत आहोत. चुकीचे अच्छे दिन आणल्याबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन असे म्हटले आहे.