नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी हा डोस घेतला. डोस घेतल्यानंतर ट्विट करत यासंबंधी त्यांनी माहिती दिली. कोरोनाला हरवण्यासाठी लसीकरण हा एक मार्ग असल्याचे ट्विटही मोदींनी केले. पुदुच्चेरीच्या पी. निवेदा आणि पंजाबच्या निशा शर्मा या परिचारिकांच्या उपस्थितीत पंतप्रधानांना लस देण्यात आली. यापूर्वी पंतप्रधानांनी 1 मार्चला लसीचा पहिला डोस घेतला होता. लसीकरणासाठी ‘को-विन’ या प्लॅटफॉर्मचा वापर करण्याचा सल्लाही पंतप्रधानांनी दिला आहे.