प्रतिनिधी / कोल्हापूर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते जय भगवान गोयल यांनी दिल्ली येथील भाजप कार्यालयामध्ये छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे पुस्तक प्रकाशित केले आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज हे आजचे नरेंद्र मोदी आहेत’ असे या पुस्तकाचे शिर्षक आहे. शिवरायांचा अपमान करणारे हे पुस्तक असल्याने देशातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि आरएसएस जोपर्यंत जनतेची माफी मागत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असा इशाराही युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या वतीने पत्रकाव्दारे दिला. भाजप कार्यालयासमोर पुतळा दहन करण्यास पोलिसांनी बंदी घातल्याने बिंदू चौकात पुतळा दहन करून, जोरदार घोषणाबाजी केली.
पत्रकात म्हंटले आहे, गोयल यांनी आपल्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच नरेंद्र मोदी आहेत असे म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप सातत्याने या ना त्या कारणाने छत्रपती शिवरायांचा अपमान करीत आहे. यापूर्वी सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी आपल्या विचारधन या पुस्तकामध्ये छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केलेले आहे. त्याचबरोबर विनायक सावरकर यांच्या पुस्तकांमध्ये छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल अवमानकारक मजकूर छापला आहे. त्यामुळे भाजप व आरएसएसमधील कार्यकर्त्यांच्या प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला. भाजप कार्यालयासमोर पुतळा दहन करण्यास पोलिसांनी रोखल्याने ठिय्या आंदोलन करण्यात आले. बिंदू चौकात घोषणाबाजी करत भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते फडणवीस यांचा पुतळा जाळण्यात आला. याप्रसंगी आरएसएस आणि भाजप मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिपक थोरात, एनएसयूआयचे अक्षय शेळके, कल्याणी माणगावे, स्वप्नील सावंत, उदय पोवार, अजिंक्य पाटील, सत्यजित शेजवळ, वैभव देसाई, सचिन रावळ, सनी नरके, रोहित पाटील, मकरंद कवठेकर, वैभव पाटील, सुशांत चव्हाण, दस्तगीर शेख, प्रशांत गणेशाचार्य, साईराज पाटील, रोहित गाडीवद्दार, आनंदा करपे, विनायक पाटोळे, सागर जाधव, गणेश हेळकर, कार्तिक पाटील आदी उपस्थित होते.