शेकडो नागरिकांची फसवणूक – चौघांना अटक
अमोल राऊत / मुंबई
पंतप्रधान कार्यालयामार्फत देण्यात येणाऱया विशेष कर्ज योजनांच्या नावाने बनावट ऍप्लिकेशन तयार करून देशातील शेकडो नागरिकांची फसवणूक करणाऱया टोळीचा पर्दाफाश करण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे आरोपींनी त्यासाठी पंतप्रधानांचे छायाचित्र व राजमुद्रा यांचा गैरवापर केला होता. गंभीर बाब म्हणजे आरोपींनी नागरिकांना जाळय़ात ओढण्यासाठी दोन नामांकित वृत्तपत्रांमध्ये जाहिरातही दिली होती.
याप्रकरणी संजीव कुमार (वय 36) याच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. संजीव कुमार हा उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील रहिवासी असून त्याला 15 फेब्रुवारीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपीला 22 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींविरोधात भादंवी कलम 419, 420, 465, 468, 170, 34 सह माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायदा कलम 66(क) व 66(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी प्रधानमंत्री योजना लोन, पीएम लोन योजना, पीएमवायएल लोन, सर्वोत्तम फायनान्स लोन सर्व्हिस अशा नावाने ऍप्लिकेशन तयार केले होते. त्यावर पंतप्रधानांचे छायाचित्र व राजमुद्रा यांचा वापर करण्यात आला होता. या कर्जासाठी आरोपींनी 900 ते 3 हजार रुपये प्रोसेसिंग फीच्या नावाने देशातील शेकडो व्यक्तींकडून घेतले.
आरोपींनी या ऍप्लिकेशनवर संपर्क क्रमांक म्हणून कुर्ल्यातील एमपीएससीची तयारी करणाऱया सूरज सावले याच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करण्यात आला होता. सावले हा मेकॅनिकल इंजिनिअर असून त्याला या ऍप्लिकेशन संदर्भात अनेक व्यक्तींचे दूरध्वनी येऊ लागले. यासाठी भरलेली रक्कम परत मागण्यासाठी आलेल्या दूरध्वनीमुळे सावलेही चक्रावला होता. त्याच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींनी देशभरातील शेकडो नागरिकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.