ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी आज ‘ट्रुथ विथ राहुल गांधी’ या मालिकेतला तिसरा व्हिडीओ शेअर केला. यात राहुल गांधी यांनी चीनविरोधात लढण्यासाठी पंतप्रधानांजवळ कुठलीही रुपरेषा नाही त्यामुळंच चीन आपल्या हद्दीत घुसला, असा आरोप केला आहे.
राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पूर्ण फोकस आपली इमेज बनवण्यावर आहे. सर्व संस्था त्याच कामात गुंतल्या आहेत. केवळ कुण्या एका व्यक्तिची प्रतिमा बनवनं म्हणजे राष्ट्राची प्रतिमा होऊ शकत नाही.
पुढे ते म्हणाले की, मोठ्या स्तरावर विचार करूनच भारताचं रक्षण केलं जाऊ शकतं. चीनबरोबर सीमा वाद आहे आणि आपण तो सोडविला पाहिजे, पण आपला मार्ग बदलला पाहिजे. आपली विचारसरणी बदलली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, राहुल गांधी यांनी ‘ट्रुथ विथ राहुल गांधी’ या मालिकेतला तिसरा व्हिडीओ शेअर केला. याआधी त्यांनी पहिला व्हिडीओ 17 जुलै रोजी शेअर केला होता. त्यात चीनकडून सीमेवर होत असलेलं आक्रमण, घुसखोरी यावर भाष्य केलं होतं. तर दुसरा व्हिडीओ हा 20 जुलै रोजी शेअर करत गांधी यांनी मोदी सरकारच्या काही धोरणांवर सवाल उपस्थित केले होते. पंतप्रधान मोदी हे डुप्लिकेट स्ट्राँगमॅनची प्रतिमा तयार करत आहेत, असं म्हटले होते.