ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका तरुणाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणाचे नाव सलमान असे असून याने पोलिसांना फोन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारणार असल्याचे सांगितले होते. सलमान 22 वर्षांचा आहे. दिल्लीतील खजुरी भागातून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय सलमानने पोलिसांना एक निनावी कॉल करून ‘मला पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठार मारायचे आहे’ अशी धमकी दिली होती.त्यानंतर खजुरी खास पोलिसांनी आरोपी सलमान याला अटक केली आहे. तसेच आपल्याला तुरुंगात जायचे असल्याने आपण हे कृत्य केले असल्याचे सलमानने पोलिसांच्या चौकशीत म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी आरोपी तरुण जामिनावर तुरुंगाच्या बाहेर आला होता. त्याच्याविरोधात अगोदरपासूनच अनेक गुन्हे दाखल आहेत. आपल्याला पुन्हा तुरुंगात जायचे असल्याने आपण धमकीचा फोन केला असल्याचे सलमानने पोलिसांना सांगितले. दरम्यान, पोलीस आरोपीची आणखी कसून चौकशी करत आहेत.
यापूर्वी जानेवारी महिन्यात देखील दिल्लीतील एका व्यक्तीने पोलिसांना कॉल करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्याची धमकी दिली होती. पंतप्रधान मोदींना ठार मारण्यासाठी 30 कोटी रुपयांची सुपारी देणार असल्याचे त्याने पोलिसांना फोनवर सांगितले होते. या प्रकरणात पोलिसांनी 30 वर्षीय पिंटू सिंह नावाच्या तरुणाला अटक केली होती. दिल्लीच्या सागरपूर भागात राहणारा पिंटू कारपेंटर म्हणून काम करत होता. मानसिक स्थिती ढासळलेल्या आरोपीने दारुच्या नशेत पोलिसांना फोन केल्याचे समोर आले होते.