हैदराबाद
संपूर्ण देशभरात पसरलेल्या कोरोना विषाणूचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी क्रीडा क्षेत्रातून अनेक दिग्गज खेळाडूसह संघटनांनी राज्य व पंतप्रधान सहायता निधीसाठी मदत केली आहे. आयपीएलमधील माजी विजेता असलेल्या सन टीव्ही ग्रुपच्या सनरायजर्स हैदराबाद संघानेही कोरोनाविरुद्ध लढय़ात मदत कार्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. सध्याच्या खडतर काळात अनेक आजी-माजी खेळाडू, बीसीसीआयसह अन्य क्रीडा संघटना मदतकार्यासाठी पुढे येत आहेत. अशातच आयपीएलमधल्या सनराईजर्स हैदराबाद संघाने पंतप्रधान मदतनिधीसाठी 10 कोटी रुपये दिले असल्याची माहिती सन टीव्ही ग्रुपने दिली. तसेच तेलंगणा राज्य सरकारच्या मदतनिधीसाठीही त्यांनी 40 लाख रुपये दिले असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, बीसीसीआयनंतर (51 कोटी) हैदराबाद संघाने दिलेली ही दुसरी मोठी रक्कम आहे.
यापूर्वी, सचिन तेंडुलकरसह, रोहित शर्मा, गौतम गंभीर, पी.व्ही.सिंधू, बजरंग पुनिया, सुनिल गावसकर, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली या सारख्या दिग्गज खेळाडूंनी कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आर्थिक मदतीसह अन्नधान्याचे वाटप, मास्कचे वाटप केले आहे.