टाळेबंदीच्या काळात ‘असा’ घालवला वेळ : चित्रफित प्रसारित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निसर्गाबद्दल असलेली आत्मियता दर्शविणारी एक चित्रफित इन्स्टाग्रामवर प्रसारित केली आहे. पंतप्रधान निवासस्थान परिसरातील मोरांचा विहार न्याहाळताना मोदी यात दिसून येतात. निवासस्थानातील लॉनमध्ये हिंडत असल्याचे यात दिसून येते. मोदींनी याचबरोबर एक कविताही प्रसारित केली आहे. या कवितेत मोर, शांतता, प्रसन्न वातावरण आणि मौनाचे महत्त्व नमूद आहे. मुरलीधर, जीवात्मा, शिवात्मा आणि अंतर्मनाची बाबही यात समाविष्ट आहे.
हवामान बदल रोखणे आणि वनसंरक्षणाच्या मुद्दय़ावर मोदी अत्यंत आग्रही राहिले आहे. त्यांनी यासंबंधी दोन पुस्तके लिहिली असून त्यात स्वतःचा दृष्टीकोन मांडला आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी निर्माण करण्यात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.
पंतप्रधानांनी अनेक संवादांमध्ये निसर्ग आणि पशूपक्षींबाबतची ओढ मांडली आहे. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी डिस्कव्हरी वाहिनीच्या मॅन व्हर्सेस वाईल्ड या लोकप्रिय कार्यक्रमात ते बेयर ग्रिल्ससोबत दिसून आले होते. चित्रफितीत पंतप्रधान निवासस्थानाला त्यांनी ग्रामीण साज दिल्याचे निदर्शनास येते.