मुंबई \ ऑनलाईन टीम
तौक्ते चक्रीवादळाचा गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीला जोरदार फटका बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादळग्रस्त भागाची बुधवारी दुपारी पाहणी केली. या दौऱ्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधल्या वादळग्रस्त भागासाठी तात्काळ 1 हजार कोटींची मदत जाहीर केली. यावरून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्रा मोदी यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्य़मातून निशाणा साधला आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्वीट करत नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, #CycloneTauktae सायक्लोन तोक्ते मुळे देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील पाच राज्ये प्रभावित झाली आहेत. पण प्रधानमंत्री मोदींनी फक्त गुजरात चा दौरा केला व त्यांना आर्थिक मदतीची घोषणा केली. हा भेदभाव का ? बाकीच्या राज्यातील पीडित जनतेच्या प्रति आपली कांही जबाबदारी नाही का? , असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राला मदत करतील असा विश्वास आज माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. यासोबतच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील यांनी केंद्र सरकार तौक्ते चक्रीवादळाचा फटाक बसलेल्या आठही राज्यांना मदत करणार असल्याचे सांगितले आहे. त्यात महाराष्ट्राला सुद्धा मदत मिळणार, हे कालच केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, याबाबत जाणीवपूर्वक राजकारण केलं जात आहे.” असा आरोप आज सकाळी महाड येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी केला आहे.