मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या वतीने प्रदान
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा सर्वोच्च ‘लिजन ऑफ मेरिट’ हा पुरस्कार त्या देशाचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. अमेरिका आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय धोरणात्मक संबंध सुदृढ करण्यासाठी घेतलेला पुढाकार आणि भारताला जागतिक शक्ती बनविण्यासाठी केलेले कार्य यांसाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आल्याचे घोषित करण्यात आले.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांच्याकडून हा पुरस्कार भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजितसिंग संधू यांनी पंतप्रधान मोदींच्या वतीने स्वीकारला. हा पुरस्कार प्रदान कार्यक्रम सोमवारी येथे पार पडला. हा पुरस्कार केवळ जागतिक राष्ट्रप्रमुखांना किंवा सरकारप्रमुखांना देण्यात येतो. हाच पुरस्कार याचवेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनाही प्रदान करण्यात आला.
कणखर नेतृत्वाचा सन्मान
पंतप्रधान मोदींचे कणखर नेतृत्व आणि दूरदृष्टी यामुळे त्यांच्या कार्यकाळात भारत एक लक्षणीय जागतिक शक्ती बनला आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी यांनी अमेरिका आणि भारत यांच्यातील सामरिक तसेच धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. जागतिक आव्हानांचा स्वीकार करताना त्यांनी आपल्या राजकीय कौशल्याचा परिचय जगाला घडविला. अशा अनेक कारणांसाठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली, असे प्रतिपादन रॉबर्ट ओब्रायन यांनी आपल्या ट्विट संदेशात केले आहे.
इतर देशांचेही सर्वोच्च पुरस्कार
पंतप्रधान मोदींना अमेरिकेच्या या सर्वोच्च पुरस्काराशिवाय इतर देशांचेही सर्वोच पुरस्कार आतापर्यंत प्राप्त झाले आहेत. त्यात सौदी अरेबियाचा अल् सौद पुरस्कार (2016), पॅलेस्टाईनचा ग्रँड कॉलर पुरस्कार (2018), गाझी अमीर अमानुल्ला पुरस्कार (2016), संयुक्त अरब अमिरातीचा ऑर्डर ऑफ झायेद पुरस्कार (2019), रशियाचा ऑर्डर ऑफ अँड्रय़ू पुरस्कार (2019) आणि मालदीवचा रूल ऑफ निशान इझुद्दिन पुरस्कार (2019) या पुरस्कारांचा समावेश आहे.