ढाका / ऑनलाईन टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर आहेत. आपल्या भेटीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी दक्षिण – पश्चिमच्या ईश्वरीपूर गावातील प्राचीन जेशोरेश्वरी काली मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी काली मंदिरात पूजा-अर्चनाही केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी याबद्दल माहिती देत एक पूजेचा व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ”जेशोरेश्वरी काली मंदिरात पूजा करून धन्य पावलो.” नरेंद्र मोदी यांचे मंदिरात शंख वाजवून आणि टिळा लावून स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी देवीला एक मुकूट, साडी आणि इतर पूजेचं साहित्यही अर्पण केले. यासोबतच त्यांनी मंदिर परिक्रमाही केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवाला अर्पण केलेल्या मुकूटाला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. हा मुकूट पारंपरिक कारागिरांद्वारे तीन आठवड्यांच्या काळात हातांनी बनवण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपण बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगला होता, असं काल म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे.