मुख्यमंत्र्यांसमवेत व्हर्च्युअल चर्चा, फार्मा कंपन्यांशीही संपर्कात
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या रुग्णांमुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर त्यामुळे प्रचंड ताण येत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनेक महत्त्वाच्या बैठका सुरु आहेत. शुक्रवारी त्यांनी पुन्हा एकदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तीन प्रमुख आढावा बैठका घेतल्या. सध्या देशात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव होणाऱया राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी व्हर्च्युअल माध्यमातून बैठक घेतली. या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेऊन काही उपाययोजनांवर चर्चा केली. तसेच सायंकाळच्या सत्रात त्यांनी विविध फार्मा कंपन्यांच्या प्रमुखांशी चर्चा करून लसनिर्मिती आणि औषधसाठय़ाबाबत आढावा घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी ऑक्सिजन पुरवठा, लसीकरण, औषधांचा काळाबाजार यावर मुख्यत्वेकरून प्रकाश टाकण्यात आला. बऱयाच मुख्यमंत्र्यांनीही ऑक्सिजनच्या पुरवठय़ाबद्दल विचारणा केली. याला उत्तर देताना पंतप्रधानांनी ऑक्सिजन पुरवठा वाढवण्याचे प्रयत्न चालू असल्याचे स्पष्ट करत सध्या औद्योगिक क्षेत्राकडचा ऑक्सिजन आरोग्य सुविधेसाठी वळवण्यात आल्याचेही सांगितले. सर्व राज्यांनी परस्पर सहकार्याने औषधे आणि ऑक्सिजनची गरज भागवावी असेही ते म्हणाले. त्याचबरोबर कोणत्याही राज्याने ऑक्सिजनची वाहतूक करणाऱया वाहनांना कुठेही अडवू नये किंवा त्यांना वेठीस धरु नये असेही बजावले.
राज्यातल्या वेगवेगळय़ा रुग्णालयांमध्ये ऑक्सजिनचा पुरवठा करण्यासाठी राज्यांनी एक उच्चस्तरीय समितीची नेमणूक करावी असेही पंतप्रधानांनी सुचवले. ही समिती केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेला ऑक्सिजन साठा गरजेप्रमाणे रुग्णालयांमध्ये वाटप करेल, असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी लागत असलेला वेळ कमी करण्याचे प्रयत्नही सुरु असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. रस्ता मार्गाबरोबरच आता रेल्वे आणि हवाई मार्गाची मदत घेतली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
केजरीवाल यांना बैठकीतच ठणकावले
बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त करत कठोर शब्दात ठणकावले. पंतप्रधानांच्या या कृतीनंतर केजरीवाल यांनी गडबडून जाऊन हाथ जोडत माफी मागितली. केजरीवाल हे बैठकीचे रेकॉर्डिंग करत असल्याचे लक्षात येताच पंतप्रधानांनी त्यांना ‘तुम्ही करत असलेली कृती योग्य नाही. अशा स्वरुपाच्या बैठकीचे थेट प्रक्षेपण करणे योग्य नाही’ असे ठणकावले. ‘आपल्याला कायम संयम ठेवायला हवा, तुमची कृती प्रोटोकॉलच्या विरुद्ध आहे. एखाद्या मुख्यमंत्र्यांनी अशा बैठकीचे थेट प्रक्षेपण करणे योग्य नाही’ अशा कठोर शब्दात पंतप्रधानांनी त्यांची खरडपट्टी काढली.