उत्तर प्रदेशात तयारी पूर्ण, सहा हजारांची गुतवणूक
लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशवर केंद्र सरकारने विशेष लक्ष केंद्रीत केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या राज्यातील महोबा आणि झांशी येथे 6 हजार 250 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आज गुरुवारी करणार आहेत. ते दुपारी 2.45 वाजता महोबा येथे पोहचतील अशी माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
अर्जुन साहाय्यक प्रकल्प, रातौली वियर प्रकल्प, भावनी धरण प्रकल्प आणि माझगाव कृषी सिंचन प्रकल्प हे चार प्रकल्प पूर्ण झाले असून त्यांचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पांमुळे या भागातील 65 हजार एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. झांशी येथे गुरुवारी संध्याकाळी ते 600 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची कोनशीला स्थापन करणार आहेत. या प्रकल्पाला 3 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. झांशी येथे त्यांच्या हस्ते अटल एकता पार्कचेही उद्घाटन होणार आहे. हे पार्क 11 कोटी रुपये खर्च करुन निर्माण करण्यात आले असून ते 40 हजार चौरस मीटरवर विस्तारले आहे.
वाजपेयींचा पुतळा
या उद्यानात दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारण्यात आला असून त्याचे अनावरणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. हा पुतळा विख्यात शिल्पकार राम सुतार यांनी निर्माण केलेला आहे. याच राम सुतार यांनी गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘एकात्मता पुतळा’ही निर्माण केला आहे. वाजपेयींचा पुतळा हे या उद्यानाचे विशेष वैशिष्टय़ आहे. त्याचप्रमाणे या उद्यानात एक भव्य वाचनालयही स्थापन करण्यात आले आहे.