नवी दिल्ली / वृत्तसंस्था
येत्या 5 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी जगप्रसिद्ध केदारनाथ मंदिराला भेट देऊन केदारनाथाचे दर्शन घेणार आहेत, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. मंदिरात ते पूजाआर्चा आणि प्रार्थना करतील. तसेच नंतर आदी शंकराचार्यांच्या पुनर्स्थापित समाधीचे आणि त्यांच्या पुतळय़ाचे लोकार्पण करतील. 2013 च्या ढगफुटी आणि महापुरात ही समाधी वाहून गेली होती. केदारनाथ हे तीर्थस्थळ उत्तराखंड राज्यात आहे. या राज्यात येत्या मार्चमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे केदारनाथाच्या दर्शनानंतर ते तेथे एका जनसभेत भाषण करतील. तसेच 130 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण करतील. तसेच 180 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांच्या कोनशीला प्रस्थापित करतील. या प्रकल्पांमध्ये संगम घाटाचा पुनर्विकास, प्रथमोपचार आणि पर्यटक सुविधा केंद्र, मंदाकिनी आस्थापथ तसेच सरस्वती नागरी सुविधा वास्तू यांचा समावेश आहे.