नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना उद्रेकाची हाताळणी, राम मंदीर आणि घटनेचा अनुच्छेद 370 निष्प्रभ करण्याचा निर्णय इत्यादी मुद्दय़ांसंबंधी केंद्र सरकारची कामगिरी लोकांना कशी वाटते, याचे सर्वेक्षण स्वतःच करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. त्यांच्या मोबाईल ऍपवर नागरीक त्यांची मते मांडू शकणार आहेत.
येत्या मार्चमध्ये उत्तर प्रदेश आणि चार इतर राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुका भाजप आणि इतर विरोधी पक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत. 2024 या लोकसभा निवडणुकीची तयारी अशा अर्थाने त्यांच्याकडे पाहिले जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे हे स्वतःचे सर्वेक्षण महत्वाचे मानण्यात येत आहे. त्यांच्या ‘शेअर युवर व्हय़ू’ या ऍपवर 13 मुद्दे देण्यात आले आहेत. नागरीक या 13 पैकी कोणत्याही किंवा सर्व मुद्दय़ांवर त्यांची मते मांडू शकतात. आतापर्यंत अनेकांनी त्यांचे विचार व्यक्त केलेले आहेत.
13 मुद्दय़ांची नोंद
महागाई, भ्रष्टाचार, कायदा-सुव्यवस्था स्थिती, राममंदिराचे निर्माणकार्य, तत्काळ तिहेरी तलाकविरोधात कायदा, अनुच्छेद 370 विरोधी निर्णय, शिक्षण धोरण, कोरोना परिस्थितीची हाताळणी, रोजगाराची स्थिती, सार्वजनिक स्वच्छता, वीजपुरवठा आणि रस्ते तसेच पायाभूत सुविधा या 13 मुद्दय़ांची सूची या ऍपवर असून त्या विषयांवर मते मांडावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.