आजपासून धावणार 30 जादा बस : यात्रेसाठी विशेष बससेवा
प्रतिनिधी /बेळगाव
भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी श्रीक्षेत्र पंतबाळेकुंद्री यात्रेसाठी परिवहनकडून जादा बस सोडल्या जाणार आहेत. यात्रेला मंगळवारपासून प्रारंभ होत असून या पार्श्वभूमीवर दि. 11, 12 आणि 13 रोजी या यात्रेसाठी बसस्थानकातून 30 अतिरिक्त बस धावणार असल्याची माहिती परिवहनने दिली.
कोरोनामुळे मागील दोन वर्षात यात्रा मर्यादित स्वरुपात झाली होती. मात्र, यंदा यात्रा मोठय़ा उत्साहात साजरी केली जाणार आहे. त्यामुळे लाखो भाविक यात्रेसाठी दाखल होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, प्रवाशांच्या सोयीखातर अतिरिक्त 30 बस पंतबाळेकुंद्री मार्गावर धावणार आहेत.
श्रीपंत बाळेकुंद्री यात्रेसाठी दरवषी महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या विविध भागांतून लाखो भाविक दाखल होत असतात. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी बाळेकुंद्री मार्गावर यात्रेसाठी अतिरिक्त बस सोडली जाणार आहे. सकाळपासून बसस्थानकातून बसफेऱया बाळेकुंद्रीकडे सुरू केल्या जाणार आहेत. शिवाय रात्री उशिरापर्यंत ही बससेवा सुरू राहणार आहे. कोल्हापूर, पुणे, मुंबई या भागातून यात्रेसाठी येणाऱया भाविकांची संख्या अधिक असते. यासाठी कोल्हापूर, पुणे आणि मुंबईसाठी अतिरिक्त बस सोडल्या जाणार आहेत.
केवळ यात्रेसाठी विशेष बससेवा
मंगळवारपासून यात्रेला प्रारंभ होत आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच भाविक दर्शनासाठी दाखल होणार आहेत. प्रवाशांच्या सोयीखातर बसस्थानकातून जादा बस पुरविल्या जाणार आहेत. केवळ यात्रेसाठी ही विशेष बससेवा उपलब्ध केली जाणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
समाधानकारक महसुलाची अपेक्षा
कोरोना काळात परिवहनला प्रचंड फटका बसला आहे. त्यामुळे विविध माध्यमातून महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यात्रा-जत्रा काळात अतिरिक्त बससेवा पुरवून महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. सौंदत्ती यात्रेतून 53 लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. त्यामुळे पंत बाळेकुंद्री यात्रेतूनही समाधानकारक महसूल प्राप्त होईल, अशी अपेक्षा परिवहनला आहे.