प्रतिनिधी /बेळगाव
श्रीपंत भक्त मंडळ व यमुनाक्का भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बंधु प्रिती 151 वा मेळावा रविवारी साजरा करण्यात आला. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व पालखी परिक्रमेचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी 8 वा. समादेवी गल्ली येथील पंतवाडय़ापासून श्रींच्या पालखी परिक्रमेला सुरुवात झाली. गोंधळी गल्ली, वेताळ देवस्थान मार्ग, कंग्राळ गल्ली, खडक गल्ली, शनिवार खूट, रिसालदार गल्ली, नार्वेकर गल्लीमार्गे पालखी पुन्हा पंतवाडय़ात पोहोचली. ठिकठिकाणी पालखीचे पंचारती ओवाळून स्वागत करण्यात आले. पालखीमार्गावर रांगोळय़ा घालण्यात आल्या होत्या.
सकाळी 11 ते 12 या वेळेत बंधुप्रिती मेळावा घेण्यात आला. पंत घराण्यातर्फे प. पू. राजन पंत व प. पू. रंजन पंत सहकुटुंब उपस्थित होते. नारायण किल्लेकर व सुनंदा किल्लेकर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आतापर्यंत झालेल्या मेळाव्यांचा आढावा घेतला. यानंतर यमुनाक्का मंडळातर्फे 101 वी ज्योतीची पंतांना महाआरती करण्यात आली व प्रसाद वाटप करण्यात आला.
दुसऱया सत्रात पंतभक्त मंडळ व यमुनाक्का भजनी मंडळाचा भजन कार्यक्रम झाला. पंत पेम लहरीतील पददर्शन गुरुचे किती सुख देते या पदावर अंतरा चव्हाण हिने भरतनाटय़म सादर केले. त्यानंतर प्रथमच दत्तात्रयांचा गोंधळ संजीवनी पाटील व सहकाऱयांनी सादर केला. प्रगती राणे हिने व्हायोलिनवर दत्ता हा स्तवनहार हे पद सादर केले. सायंकाळी 4.30 वा. आरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ना. रा. किल्लेकर, सुनंदा किल्लेकर, सुरेश जांबोटकर, भारतभूषण सायनाकर, राजेश पावशे, नीता पाटील, अरुणा शिंदे, सुजय पाटील, महेंद्र राणे, आर. के. कालकुंद्रीकर यासह इतरांनी सहकार्य केले. यावेळी मोठय़ा संख्येने भक्त उपस्थित होते.