बाळेकुंद्री /वार्ताहर
रंगात उपयोग करण्यात येणारे टर्पेंटाईन पिऊन दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील पंतबाळेकुंद्री येथे शनिवारी उघडकीस आली . रिधा इम्रान जमादार असे मयत झालेल्या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे.
घरचे लोक घरासमोर असलेल्या बैलगाडीला रंग लावण्याच्या कामात मग्न असताना सदर मुलगी घरातून बाहेर पडली. घरातील पाण्याची बाटली समजून त्या बालिकेने टर्पेंटाईन प्राशन केले होते . त्यानंतर तिला तातडीने बेळगावातील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते . परंतु उपचाराचा उपयोग झाला नसल्याने तिचा मृत्यू झाला आहे. बालिकेच्या निधनाने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.