वृत्तसंस्था/ मुंबई
आयपीएल क्रकेट स्पर्धेत रविवारी येथे कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्याला दुपारी 3.30 वाजता प्रारंभ होणार आहे. दिल्ली संघाचा कर्णधार ऋषभ पंत आणि कोलकाता संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर यांच्यात चुरस अपेक्षित आहे.
2020 आयपीएल स्पधेंत दिल्ली कॅपिटल्स संघाला पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचवण्याचे सर्व श्रेय या संघाचा तत्कालीन कर्णधार श्रेयस अय्यरला द्यावे लागेल. गेल्यावर्षी आयपीएल हंगामात दुखापतीमुळे अय्यरला निम्या टप्प्यामध्ये सहभागी होता न आल्याने श्रेयसच्या जागी ऋषभ पंतची दिल्ली संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान 2022 आयपीएल क्रिकेट हंगामासाठी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये 27 वर्षीय श्रेयस अय्यरला कोलकाता नाईट रायडर्सच्या प्रँचायझींनी घेत त्याच्याकडे कर्णधारपद सोपविले.
अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स संघानी चार सामन्यांतून सहा गुण घेत वरचे स्थान पटकाविले आहे. कोलकाता संघाला बेंगळूर संघाविरूद्ध सामन्यात हार पत्करावी लागली होती. पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघाने या स्पर्धेत विजयी सलामी दिल्यानंतर झालेल्या पाठोपाठच्या सामन्यात हार पत्करावी लागली असून हा संघ गुणतक्त्यात सातव्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज नॉर्त्जेचे पुनरागमन झाल्याने दिल्लीची गोलंदाजी थोडी भक्कम राहील. कोलकाता नाईट रायडर्स संघाने या स्पर्धेत माजी विजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या कमिन्सने वादळी फलंदाजी करताना 15 चेंडूत 56 धावा झोडपल्या होत्या. कोलकाता संघातील वेगवान गोलंदाज उमेश यादव हा चांगल्याच फॉर्ममध्ये दिसत आहे. सुनील नरेन, फिंच, रस्सेल, वेंकटेश अय्यर हे या संघातील प्रमुख खेळाडू आहेत.