श्री सरस्वती वाचनालयाच्या डॉ. शकुंतला गिजरे सभागृहात आयोजन
प्रतिनिधी/ बेळगाव
श्री सरस्वती वाचनालय संचालित संगीत कला मंच आयोजित पं. कुमार गंधर्व संगीत संमेलनाला शनिवारी प्रारंभ झाला. वाचनालयाच्या डॉ. शकुंतला गिजरे सभागृहात झालेल्या या संमेलनाच्या पहिल्या सत्राची सुरुवात पारंपरिक आमद, पेशकार, विविध लयकारीने नटलेले कायदे, मध्य लयीतील आकर्षक गती आणि द्रुत लयीतील टुकडे, मोहर, चक्रदार यांनी संपन्न त्यांचे वादन श्रोत्यांसमोर पेश केले. त्यांना नगमा साथ संतोष पुरी यांनी अत्यंत कुशलतेने केली.
मध्यंतरानंतर पुण्याचे मंदार गाडगीळ यांनी संमेलनाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात केली. त्यांनी राग पुरियामध्ये विलंबित एकताल आणि द्रुत त्रितालात ख्याल सादर केला. पारंपरिक ख्याल भरणा आणि उत्तम स्वरलगाव, गमकयुक्त सरगम मांडणी ही त्यांच्या गायिकीची वैशिष्ट्यो ठरली. पूरीयानंतर त्यांनी दुर्गामध्ये मध्यलय एकतालात बंदिश सादर केली. यानंतर देवाघरचे ज्ञात कुणाला’ हे अवीट नाट्यापद त्यांनी पेश केले. आपल्या कार्यक्रमाचा शेवट त्यांनी ‘देव बंदा नम्म स्वामी बंदानो’ हे दासर पद गाऊन केला. त्यांच्याबरोबर संवादिनीवर वामन वागुकर आणि तबल्यावर नारायण गणाचारी आणि तानपुरा साथ स्नेहा कुलकर्णी व पूजा चव्हाण-पाटील यांनी केली.
प्रारंभी तबलावादक बंडोपंत कुलकर्णी, डॉ. दत्तप्रसाद गिजरे, आरबोळे, विजय देशपांडे आणि अंगद देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कलाकारांचा परिचय करून देऊन समीरा मोडक यांनी सूत्रसंचालनही केले. कलाकारांचा सत्कार अनुक्रमे सुहास सांगलीकर व कुबेर गणेशवाडी यांनी केला. या कार्यक्रमाला रसिकांची लक्षणीय उपस्थिती होती.
आज ‘बेळगाव भूषण’ पुरस्काराचे वितरण रविवारी सकाळी 10 वाजता संमेलनांतर्गत स्वतंत्र गायन होणार आहे. सायंकाळी 5.30 वाजता ‘बेळगाव भूषण’ पुरस्काराचे वितरण व त्यानंतर पुन्हा गानमैफील होणार आहे.