प्रतिनिधी /मडगाव
गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी अशी आक्रामक भूमिका घेणारे दक्षिण गोव्याचे खा. फ्रान्सिस सार्दिन यांनी आत्ता आपली भूमिका बदलली असून गिरीश चोडणकर यांनाच प्रदेश अध्यक्षपदी कायम ठेवल्याने पक्षाचा निर्णय आपल्याला मान्य असल्याची प्रतिक्रीया काल मंगळवारी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
सोमवारी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी गिरीश चोडणकर यांचे अध्यक्षपद कायम ठेवल्याने, त्यांच्या अध्यक्षपदाला विरोध करणारे बरेच नेते बॅकफुटवर गेले आहेत. त्यात दक्षिण गोव्याचे खा. फ्रान्सिस सार्दिन यांचा देखील समावेश आहे. गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष पुढे जाऊ शकत नाही, त्यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी यासाठी खा. सार्दिन यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी देखील उघड केली होती. मात्र, सोनिया गांधी यांनी गिरीश चोडणकर यांनाच अध्यक्षपदी कायम ठेवताना त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.
खा. सार्दिन प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आपण काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असून पक्ष जो निर्णय घेईल, तो आपल्याला मान्य आहे तसेच आपण यापुढे देखील पक्षाच्या हितासाठी कार्यरत राहणार आहे. पक्षाने जेव्हा आपले मत विचारले होते, त्यावेळी आपण आपले मत मांडले होते. आत्ता पक्षाने निर्णय घेतला असून तो आपल्याला बंधनकारक आहे. आपण या निर्णयावर समाधानी आहात की नाही हा विषय महत्वाचा नसल्याचे खा. सार्दिन म्हणाले.