मुंबई \ ऑनलाईन टीम
उत्तर प्रदेशमधीलवरीष्ठ नेते जितिन प्रसाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीमधील भाजपच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावर काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.
मिलिंद देवरा यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, भारतातील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा उभारी घेईल, असा मला विश्वास आहे. आजही आपल्याकडे एक मजबूत फळी आहे, ज्याचा वापर योग्य ताकदीने केल्यास त्याचा मोठा फायदा आपल्याला होईल. त्यामुळे आशावेळी पक्षातील मित्र व सहकाऱ्यांनी आम्हाला सोडून जाऊ नये, अशी इच्छा मिलिंद देवरा यांनी या ट्वीटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
यासोबतच भाजप नेते निलेश राणे यांनी देखील काँग्रेस नेते राहुल गांधी यांना यावरून टोला लगावला आहे.निलेश राणे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, राहुल गांधींच्या सगळे जवळचे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. राहुल गांधींच्या स्वभावाचाचं हा एक भाग आहे, मला सगळं कळतं आणि मीच सर्वात शहाणा हा स्वभाव काँग्रेसला घेऊन डुबला. राहुल गांधी यांनी स्वतः भाजपात प्रवेश करावा हा त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय उरला आहे.
पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होत आहे. राजकीय दृष्ट्या उत्तर प्रदेश हे देशातील एक अत्यंत महत्वाचे राज्य आहे. भाजप येथील निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. आशातच काँग्रेसच्या या मोठ्या नेत्याचा भाजप प्रवेश म्हणजे, काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. भाजपचे उत्तराखंडमधील खासदार अनिल बलूनी यांनी आज सकाळीच जितिन प्रसाद भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती ट्वीटच्या माध्यमातून दिली होती.