प्रतिनिधी / सांगली
माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन महापौर, उपमहापौरपदाचे उमेदवार अंतिम करण्यात येतील. या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपा नगरसेवकांच्या बैठकीत बोलताना केले. महापौर, उपमहापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी इच्छुकांसह सर्व नगरसेवकांशी स्वतंत्रपणे बंद खोलीत चर्चा केली. त्यानंतर भाजपा कोअर कमिटीशीही त्यांनी मॅरेथॉन चर्चा केली.
यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, गटनेते युवराज बावडेकर, स्थायी समिती सभापती संदीप आवटी भाजपचे सहयोगी सदस्य गजानन मगदूम, विजय घाडगे यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या. महापौर, उपमहापौर पदासाठी उद्या अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. तर शुक्रवारी निवडी होणार आहेत. सत्ताधारी भाजपामध्ये महापौरपदासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. सविता मदने, उर्मिला बेलवलकर, गीता सुतार, कल्पना कोळेकर, अनारकली कुरणे, लक्ष्मी यमगर, नसीमा नाईक यांची नावे चर्चेत आहेत. तर उपमहापौरपदासाठी आनंदा देवमाने, प्रकाश ढंग. पांडुरंग कोरे इच्छुक आहेत. महापौरपदासाठी सर्वात जास्त चुरस आहे. सविता मदने, उर्मिला बेलवलकर व गीता सुतार यांची नावे आघाडीवर आहेत. कोअर कमिटीने इच्छुकांची नावे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे पाठवली होती.
बंद खोलीत चर्चा
शनिवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील सांगलीत आले होते. येथील सर्किट हाऊसमध्ये त्यांनी नगरसेवकांची बैठक बोलावली होती. पाटील यांनी प्रथम इच्छुकांशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर प्रत्येक नगरसेवकांशी बंद खोलीत त्यांनी संवाद साधला. त्यांची मते जाणून घेतली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी भाजपाच्या कोअर कमिटीतील नेत्यांशीही चर्चा केली. माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन महापौर, उपमहापौरपदासाठी उमेदवारांची नावे अंतिम केली जातील. त्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे रहा. त्यांना निवडून आणा असे आवाहन पाटील यांनी सर्व नगरसेवकांना केले.
सावध राहा, कारभाऱयांना सल्ला
महापौरपदावरुन भाजपामध्ये अंतर्गत कहल सुरु झाल्याची चर्चा आहे. काही इच्छुकांच्यामध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे. त्यांना डावलल्यास या नाराजीचा स्फोट होण्याची शक्यता असल्याने बोलले जात आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी कोअर कमिटीसह कारभाऱयांना सावध राहण्याचा सल्लाही दिल्याचे समजते. दरम्यान, बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून अत्यंत सावध पावले टाकली जात आहेत. इच्छुकांची संख्या वाढल्याने दगाफटका होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. त्यासाठी अर्ज भरण्याच्या अंतीम क्षणी महापौरपदाचा उमेदवार जाहीर करण्यात येईल अशी भाजपाच्या गोटात चर्चा आहे.
फडणवीस दिल्लीत, चंद्रकांतदादाही जाणार
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली येथे आहेत. कोअर कमिटीकडून दिलेली नावे घेऊन चंद्रकांतदादा दिल्लीला जाणार आहेत. तिथे फडणवीस यांच्याशी ते चर्चा करतील. त्यानंतर सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या काही तास आधी महापौर व उपमहापौर पदासाठी प्रत्येकी एक नाव जाहीर करण्यात येणार आहे.