सातारा पालिका कर्मचाऱयांना वेतनाची प्रतिक्षा
प्रतिनिधी/ सातारा
कोरोना काळात सातारा पालिकेचे कर्मचारी निष्ठेने शहरवासियांसाठी काम करत आहेत. मात्र, त्याच कर्मचाऱयांना महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात मिळणारे वेतन दुसऱया आठवडय़ातही मिळेना अशी परिस्थिती गेली दोन महिने सुरु आहे. त्यामुळे पालिकेतील सर्वच कर्मचारी नाराज असून सोमवारी पगार नाही झाला तरी पालिकेचे कामकाज मंगळवारी बंद ठेवण्याच्या अनुषंगाने पालिका कामगार संघटनांची चर्चा विनिमय सुरु आहे.
सातारा पालिकेत विविध विभागात सुमारे 600 कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱयांना नियमित महिन्याच्या 1 तारखेलाच वेतन दिले जाते. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून पालिकेकडूनच दिरंगाई होवू लागली आहे. गत महिन्यामध्ये पंधरा तारीख उटलून गेल्यानंतर वेतन दिले गेले. याही महिन्यात दि. 18 रोजीपर्यंत वेतन झाले नव्हते. पालिका कर्मचारी वेतन कधी होईल याकडे कटाक्षाने नजरा लावून बसलेले आहेत. पालिका कर्मचाऱयांना मुलांच्या शिक्षणाची फी भरायची आहे, कर्जाचे हप्ते भरायचे आहेत, घरभाडे द्यायचे आहे, लाईट बील भरायचे आहे, असे अनेक प्रश्न पगार नसल्याने उद्भवले गेले आहे. सोमवारी जर पालिकेतून पगार जमा झाला नाही तर आंदोलन करण्याच्या तयारीत संघटना आहेत.