ऑनलाईन टीम / पटणा :
बिहारची राजधानी असलेल्या पटनामधील राजेंद्र मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (आरएमआरआईएमएस) मध्ये कोरोनाच्या नमुन्यांची वेगाने तपासणी करण्यासाठी आयसीएमआरकडून एक विशेष मशीन बसवण्यात आली आहे.
याबाबत माहिती देताना आयसीएमआरच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कोबास 6800 असे या मशीनचे नाव असून ही मशीन एका दिवसात 1500 टेस्ट करते. त्यामुळे या मशीनद्वारे पटणामध्ये कोरोनाच्या टेस्टची वेगाने करण्यास मदत होणार आहे.
रोबोटिक्स तंत्रज्ञानाने बनलेल्या या मशीनला कोणत्याही मानवी स्पर्शाशिवाय दुरूनही चालवता येते. त्यामुळे या मशीन पासून संसर्गाचा धोका कमी होतो तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना देखील संसर्गाचा धोका राहत नाही.
आयसीएमआरचे महनिर्देशक प्रोफेसर बलराम भार्गव यांनी सांगितले की, ही बिहारमध्ये अशा प्रकारची पहिली सुविधा आहे. या मशीनमुळे संस्थांमध्ये कोविड 19 च्या डायोग्नोस्टिक प्रयोगशाळेची क्षमता वाढवण्यासाठी मदत मिळणार आहे.
पुढे ते म्हणाले, देशातील विविध भागात काम करणारे मजूर बिहारमध्ये येत आहेत. त्यामुळे बिहारमध्ये टेस्टचे प्रमाण वाढवण्याची गरज आहे. सध्या पाटणा मधील या संस्थेत चार आरटी – पीसीआर या मशीन द्वारे दररोज दोन हजार नमुन्यांची तपासणी केली जाते. त्यासाठी 25 हजार लोक तीन शिफ्ट मध्ये चोवीस तास काम करतात.
प्रोफेसर भार्गव म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानंतर या मशीनचा उपयोग अन्य रोगांच्या तपासणीसाठी म्हणजेच हिपेटायटीस बी आणि सी, एचआयव्ही, एमटीबी , नायसेरिया- डेंग्यू आदींसाठी केला जाऊ शकतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.