प्रतिनिधी / मडगाव
गोवा बागायतदार, आर्लेम या संस्थेच्या व्यवस्थापकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला मूळ झारखंड राज्यातील व सध्या गोव्यात ट्रक चालवत असलेला ट्रक चालक जितेंद्र पाल (35) याला न्यायालयाने काही अटी घालून जामिनावर सोडण्याचा आदेश मंगळवारी दिला.
आर्लेम जंक्शन, फातोर्डा येथे सोमवारी सायंकाळी उशिरा झालेल्या रस्ता अपघातात दुर्गाभाट -फोंडा येथे राहणारे दत्तप्रसाद पटवर्धन (47) यांना मृत्यू आला होता. श्री. पटवर्धन हे गोवा बागायतदार, आर्लेम या संस्थेचे व्यवस्थापक होते आणि सोमवारी सायंकाळी काम संपवून ते फोंडा येथे जात असताना हा अपघात झाला होता.
झारखंड राज्यातील चालक चालवत असलेल्या जीए-06-टी-9211 क्रमांकाच्या ट्रकची जबदरदस्त धडक बसल्याने हा अपघात झाला होता. गंभीररित्या जखमी झालेल्या पटवर्धन यांना सरकारी इस्पितळात नेत असताना वाटेतच त्यांना मृत्यू आला होता.
प्राप्त माहितीनुसार झारखंडचा हा ट्रक चालक अत्यंत निष्काळजीपणे ट्रक चालवत होता आणि त्यातूनच हा अपघात घडला होता. भर वेगात जात असलेल्या या ट्रक चालकाचा ताबा गेल्यामुळे रस्त्याच्या दुभाजकाला ट्रकची धडक बसली आणि त्यात दुचाकीवरुन जात असलेल्या पटवर्धन यांचा बळी घेतला होता.
आरोपी जितेंद्र पाल या झारखंडच्या या ट्रक चालकाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 279 व 304-अ कलमाखाली यापूर्वीच गुन्हा नोंद केलेला आहे. हे गुन्हे जामीनपात्र आहेत. पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढील तपास चालू आहे.