माळमारुती पोलिसांची कारवाई, मारहाण करुन लुटली होती रोकड
प्रतिनिधी/ बेळगाव
बेंगळूरहून पट्टणकुडी (ता. चिकोडी) येथे जाणाऱया वृद्धाला मारहाण करुन त्याच्याजवळील रोकड, मनगटी घडय़ाळ व मोबाईल पळविणाऱया जोडगोळीला अटक करण्यात आली. माळमारुती पोलिसांनी ही कारवाई केली. दोन दिवसांपूर्वी गांधीनगरजवळ लुटमारीची घटना घडली होती.
परवेज जमीर पारिश्वाडी (वय 20, रा. आदिलशाह गल्ली, न्यू गांधीनगर), जुबेर अब्दुलरशीद दलायत (वय 20, रा. खुदादाद गल्ली, न्यू गांधीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याजवळून 18 हजार 500 रुपये रोख रक्कम, एक एटीएम कार्ड, एक मनगटी घडय़ाळ एक मोबाईल संच जप्त करण्यात आला आहे.
तम्माण्णा मलगौडा सोमण्णावर (वय 61 रा. पट्टणकुडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन माळमारुती पोलीस स्थानकात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, गुन्हे तपास विभागाचे उपायुक्त चंद्रशेखर निलगार, मार्केटचे प्रभारी एसीपी एन. व्ही. बरमनी, पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक होन्नाप्पा तळवार व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
8 जुलै रोजी पहाटे 5 वाजता गांधीनगर बायपासजवळ कार उभी करुन तम्माण्णा लघुशंकेला गेले होते. त्यावेळी काठीने मारहाण करुन त्यांच्या खिशातील रोख रक्कम, मनगटी घडय़ाळ व मोबाईल संच पळविण्यात आला होता. त्यांना कणबर्गी रोडवरील एसबीएम एटीएमला नेवून बँक खात्यातून 20 हजार रुपये काढून घेण्यात आले होते. या प्रकरणी न्यू गांधीनगर येथील जोडगोळीला पोलिसांनी अटक केली आहे.