भरदिवसा चोरी : बंद घर चोरटय़ांनी फोडले, पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
वार्ताहर /पट्टणकुडी
भर दुपारी घरफोडी करून चोरटय़ांनी सुमारे 14 लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना पट्टणकुडी येथे गुरुवार दि. 24 रोजी दुपारी एक ते चार या दरम्यान घडली. भरदिवसा झालेल्या चोरीमुळे पट्टणकुडी परिसरात एकच खळबळ उडाली असून चोरटय़ांना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
याबाबत माहिती अशी की, फिर्यादी सुरेश शिवाजी शेलार हे आपल्या पत्नीसमवेत निपाणी-चिकोडी राज्यमार्गानजीक पट्टणकुडी येथे राहतात. दरम्यान गुरुवारी दुपारी 12.45 वा. सुरेश शेलार हे आपल्या पत्नीसमवेत आपले घर कुलूपबंद करून आपल्या बहिणीच्या गावी करंजीवणे (ता. कागल) येथे गेले होते. याचाच फायदा घेत चोरटय़ांनी बंद घराचा दरवाजा तोडून 29 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 20 मौल्यवान वस्तू असा एकूण 14 लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला आहे. सुरेश शेलार हे सायंकाळी 5 वाजता घरी परतल्यानंतर त्यांना घडलेला प्रकार लक्षात आला. लागलीच त्यांनी खडकलाट पोलिसांना घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच डीएसपी बसवराज यलीगार, सीपीआय संगमेश शिवयोगी, पीएसआय लक्ष्मपा हरी, साहाय्यक उपनिरीक्षक डी. बी. कोतवाल आणि हवालदार एम. व्ही. पुजारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरटय़ांनी घराचे कुलूप तोडून तिजोरी फोडून त्यातील किमती ऐवज लांबविला आहे. यावेळी ठसे तज्ञ आणि श्वानपथकाला बोलावून तपासकार्य हाती घेण्यात आले. चिकोडी-निपाणी राज्यमार्गावर जावून श्वान पट्टणकुडी-वाळकी रस्त्यापर्यंत घुटमळले. या घटनेची नोंद खडकलाट पोलिसात झाली असून पोलीस तपास करीत आहेत. या परिसरातील ही मोठी चोरीची घटना भरदुपारी घडल्याने पट्टणकुडीसह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान पोलिसांसमोर चोरटय़ांचा शोध घेण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.