वृत्तसंस्था/ वडोदरा
टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांनी वडोदरा पोलिसांना कोविड-19 विरोधात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या व्हिटॅमिन-सी गोळ्या उपलब्ध करुन दिल्या. रविवारी वडोदार पोलीस आयुक्त कार्यालयात त्यांनी या गोळय़ा सुपुर्द केल्या.
सध्याच्या घडीला कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले आहे. भारतात देखील कोरोनाग्रस्तांचा आकडा 40 हजाराच्या पुढे गेला आहे. या लॉकडाऊनमय स्थितीत वडोदरा शहर पोलिसही आपले काम योग्य रीतीने करीत आहेत आणि त्यांना मदत करण्यासाठी राज्यातील दोन स्टाक क्रिकेटपटूंनी पुढाकार घेतला आहे. पठाण बंधूंनी वडोदरा पोलिसांना रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन-सी गोळय़ा उपलब्ध करुन दिल्या आहेत. वडोदरा शहर आयुक्त अनुपम सिंह गहलौत व त्यांच्या सहकाऱयांसाठी व्हिटॅमिन सी गोळ्या प्रदान केल्याबद्दल इरफान पठाण, युसुफ पठाण यांचे धन्यवाद, असे ट्विट वडोदरा शहर पोलीस आयुक्त कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, याआधीही पठाण बंधूनी पंतप्रधान व राज्य सरकारच्या मदतनिधीसाठी मदत केली होती. तसेच वडोदरा शहरातील गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे कीटही दिले होते.
भारतीय महिला हॉकी संघाकडून 20 लाखांची मदत
बेंगळूर : भारतीय महिला हॉकी संघानेही कोरोनाग्रस्तांसाठी पुढाकार घेताना 20 लाख रुपयांची मदत केली आहे. सोमवारी भारतीय महिला संघाने ही मदत नवी दिल्लीतील गरजू व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या उदय फौंडेशन या संस्थेला केली आहे. महिला हॉकी संघाचे 18 दिवसीय शिबिर बेंगळूर येथे रविवारी पार पडले. यानंतर, महिला हॉकी संघातील प्रत्येक सदस्याने योगदान देत हा निधी जमा केला असल्याचे कर्णधार राणीने सांगितले.