प्रतिनिधी/ पणजी
पणजीचे माजी आमदार, माजी नगराध्यक्ष, मगो पक्षाचे माजी अध्यक्ष बाबन अनंत नाईक यांचे काल सोमवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी निलम, एक कन्या, पुत्र सनिल तसेच सतीश, संदीप व सुनील नाईक हे तिघे भाऊ व अन्य मोठा असा परिवार आहे. बाबन नाईक यांच्या पार्थिवावर सायंकाळी सांत ईनेज येथील स्मशानभूमीत अंत्यसस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
एकेकाळी सत्तेवर राहिलेल्या व कालांतराने विरोधी पक्षात बसलेल्या मगो पक्षाचा दबदबा गोव्याच्या राजकारणात होता.
युगोचा पराभवर करुन बनले आमदार
त्या पक्षाचे संस्थापक नेते व पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या काळात युवा नेते म्हणून काम केलेल्या बाबन नाईक यांनी इमाने हतबारे मगो पक्षाची सेवा केली. त्याबद्दल त्यांना भाऊसाहेब बांदोडकर यांनी 1972 च्या विधानसभा निवडणुकीत पणजी मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले. पणजी विधानसभा मतदारसंघावर युनायटेड गोवन्स (युगो) या पक्षाचे नेहमीच प्राबल्य असायचे. त्या जागी बाबन नाईक हे मगोच्या उमेदवारीवर विजयी झाले. ते पणजीचे पहिले व शेवटचे मगोचे आमदार ठरले.
समाजसेवेचे व्रत स्वीकारलेले बाबन
बाबन नाईक हे व्यक्तिमत्त्व हसतमुख चेहऱयाचे होते. मगो पक्षात राहून त्यांनी गोव्यात जी समाजसेवा केली त्याला तोड नाही. पणजी पालिकेवर नगरसेवक म्हणून विजयी झालेले बाबन 1975-76 या वर्षाकरीता ते पणजीचे नगराध्यक्षही बनले. गोमंतक मराठा समाजाचे काम व कार्य तळागाळापर्यंत पोहोचून या समाजाला स्वाभीमानाने जगण्यासाठी भाऊसाहेबांबरोबर त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. पणजीत ‘दयानंद स्मृती’ नावाची गोमंतक मराठा समाजाची जी भव्य वास्तू उभी केली आहे तिच्या उभारणीत खऱया अर्थाने सिंहाचा वाटा नाईक यांचा आहे. अडल्या नडल्यांना मदत करणे हेच त्यांचे ध्येय. 1990 च्या पूर्वी मगो पक्षाचे कार्य अध्यक्षपद सांभाळणारे बाबन नाईक हे गोव्यात पुलोआचे सरकार स्थापन झाल्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री ऍड. रमाकांत खलप यांनी मंत्रीपद स्वीकारल्याने पक्षाचे अध्यक्षपद सोडल्यानंतर बाबन नाईक हे मगोचे नवे अध्यक्ष बनले.
शेवटच्या श्वासापर्यंत मगोशी बांधिलकी
पुढे पाच वर्षे त्यांनी हे पद सांभाळले. त्यानंतर सुरेंद्र सिरसाट हे पक्षाचे अध्यक्ष बनले. त्यावेळी बाबन नाईक हे पक्षाचे कोषाध्यक्ष बनले. भाऊसाहेबांच्या काळात त्यांनी मगो पक्षात प्रवेश केल्यापासून सोमवारी शेवटचा श्वास घेईपर्यंत बाबन नाईक यांनी मगो पक्ष कधीही सोडला नाही. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या निधनानंतर शशिकला ताई काकोडकर यांनाही बाबन नाईक यांनी सहकार्य केले होते.
गेली काही वर्षे बाबन नाईक हे गुडघादुखीने आजारी होते. गुडघ्यांवर प्रत्यारोपण केल्यानंतर पासून चालणेही कमी झाले होते. सोमवारी दुपारी त्यांची प्रकृती अचानक बिघडली व ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे दुपारी 2.45 वा. दरम्यान निधन झाले. सायंकाळी 7 च्या दरम्यान सांत ईनेज स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नाईक सचोटीचे राजकारणी, महान समाजसेवक होते : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी, माजी आमदार स्व. बबन नाईक यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. नाईक हे, 1972 साली महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तिकिटावर विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. ते एक उत्तम व्यक्ती व सचोटीचे राजकारणी व महान समाजसेवक होते, असे नमूद करुन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या दु:खी कुटुंबाप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. हे नुकसान सहन करण्यासाठी ईश्वर त्यांना शक्ती देवो व गेलेल्या आत्म्यास शांती प्रदान करो, अशी प्रार्थना केली आहे.
पक्षासाठी नेहमीच प्रामाणिक राहिले : सुदिन ढवळीकर
मगो नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांनी बाबन नाईक यांनी मगो पक्षासाठी अविरतपणे केलेले काम कधीही विसरता येणार नाही. मगो पक्षाशी हा नेता नेहमीच प्रामाणिक राहिला. मगोतून मोठे झालेले अनेक नेते मगो सोडून गेले. परंतु बाबन नाईक हे मगो पासून कधीही दूर गेले नाहीत, ते शेवटपर्यंत मगो बरोबर राहिले, अशा या नेत्याच्या निधनाने मगो पक्षाला व मला स्वत:ला फार दु:ख झाले असून आपण त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात सामील होत असल्याचे सुदिन ढवळीकर यांनी म्हटले आहे.
नाईक यांच्याबरोबर दहा वर्षे काम केले : धर्मा चोडणकर
माजी आमदार धर्मा चोडणकर म्हणाले की, आपण मगो पक्षाचा सरचिटणीस असताना बाबन नाईक हे कोषाध्यक्ष होते. नाईक यांनी पक्षासाठी अत्यंत प्रामाणिकपणे काम केले. त्यांच्याबरोबर आपण 10 वर्षे काम केले. हा नेता कधीही कोणावर चिडला नाही. उलटपक्षी सर्वांना मदत करण्यासाठी हा नेता नेहमीच अग्रेसर असायचा. त्यांनी आपल्याला फार सहकार्य केले असून त्यांच्या निधनाने आपल्याला दु:ख होत आहे, असे चोडणकर म्हणाले.
एका चांगल्या मित्राला मुकलो : मंगलदास नाईक
पणजी शिमगोत्सव मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व समाजसेवक मंगलदास नाईक यांनी बाबन नाईक यांच्या निधनाने एका चांगल्या मित्राला आम्ही मुकलो असे निवेदन केले. भाऊसाहेब बांदोडकर यांनी बाबन नाईक यांना फिशरीज फेडरेशनच्या अध्यक्षपदी नियुक्त केले होते. भाऊसाहेब देखील गंमतीने बाबन नाईक यांचा आदरपूर्वक उल्लेख करायचे. मत्स्यहार वर्ज असलेला अध्यक्ष म्हणून मंगलदास नाईक यांनी बाबन नाईक यांच्या निधनाने दु:ख व्यक्त केले आहे.
बाबन नाईक निष्कलंक, परोपकारी आयुष्य जगले :खलप
आपले जिवलग मित्र, कौटुंबिक स्नेही तथा राजकारणातले धुरंधर सहकारी, पणजीचे माजी महापौर व माजी आमदार बाबन नाईक याचे दु:खद निधन मनाला चटका लावून गेले. गेली पाच दशके ते राजकीय पटलावर दिमाखाने वावरले. स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांची त्यांच्यावर विशेष मर्जी होती. स्व. भाऊंच्या कारकिर्दीत महापौर व आमदारपदी ते आरुढ झाले. स्व. शशिकलाताई काकोडकरांसमवेत त्यांनी विधानसभा गाजवली. मगोला पुनः संजीवनी देण्यासाठी त्यानी जीवाचं रान केले. पक्षाचा साधा शिलेदार म्हणून राजकारणात पदार्पण केलेले बाबनराव पक्षाचे खजिनदार, सरचिटणीस, कार्यकारी अध्यक्ष, पक्षाध्यक्ष झाले. हसतमुख, उद्यमशील असलेला हा लोकनेता स्वच्छ, निष्कलंक, परोपकारी आयुष्य जगला. माझ्या राजकीय वाटचालीत बाबनचा सहभाग मोठा होता. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच प्रार्थना, असे ऍड. रमाकांत खलप यांनी म्हटले आहे.