व्यावसायिकांनी अर्ज करावेत व निर्बंध पाळावेत : मडकईकर
प्रतिनिधी / पणजी
पणजी महानगरपालिका क्षेत्रातील दुकाने खुली करण्यासाठी महानगरपालिकेची परवानगी घ्यावी लागेल. दुकानदारांनी अर्ज केल्यास मनपा परवानगी देईल मात्र मान्यता न घेता दुकाने खुली केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा मनपाचे महापौर उदय मडकईकर यांनी दिला आहे.
केंद्र सरकारने काढलेल्या आदेशावरून काहींनी शनिवारी दुकाने खुली केली. स्पा, सलुनही खुले केले गेले. त्यांनी आदेश व्यावस्थित वाचलेला नाही. स्पा, सलुन खुले करण्यास मान्यता नाही. त्याचबरोबर हॉटेल व्यवसाय बंद राहणार आहे, मात्र त्यांना घरपोच पार्सल देण्यास मान्यता आहे. हार्डवेअर तसेच अन्य दुकाने खुली करण्यास मनपा मान्यता देईल. सोमवारपासून ज्यांना दुकाने खुली करायची आहेत त्यांनी अर्ज द्यावा, अशी सूचना मडकईकर यांनी केली आहे.
सामाजिक अंतर राखा
दुकानदारांनी, ग्राहकांनी सामाजिक अंतर राखावे यासाठी दुकानासमोर मार्किंग करणे आवश्यक आहे. मनपा निरीक्षक याची पाहणी करतील. त्याचबरोबर दुकानातील कर्मचारी जास्त असतील तर अर्ध्या कामगारांना आलटून-पालटून कामावर बोलवावे लागेल. मास्क वापरावे लागेल. सोमवारी अर्ज केल्यास त्यावर मनपा निर्णय घेईल व मान्यता देईल. मात्र मान्यता न घेता कुणीही दुकाने खुली करू नयेत. तसे केल्यास दुकाने बंद करावी लागतील.
लोकांनी 3 मेपर्यंत थोडी कळ सोसावी. तोपर्यंत गोव्यातील स्थिती नियंत्रणात आल्यास त्याचा फायदा राज्याच्या दृष्टीने मोठा असेल. त्यामुळे लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मडकईकर यांनी केले आहे.
आयनॉक्स यार्डमध्ये भाजी विक्रेत्यांची सोय
सध्या आयनॉक्स बंद आहे. त्यामुळे पणजी मार्केटमध्ये भाजी विक्री करणाऱयांना आयनॉक्स याडॅमध्ये सोय करून देण्याचा विचार आहे. मार्केट बाहेर वाहनातून भाजी विक्री केली जाते व त्यासाठी लोक गर्दी करतात. त्यावर उपाययोजना म्हणून हा विचार चालला आहे. भाजी विक्रीची जागा मार्किंग करून देण्यात येईल. सोमवारी यावर ठोस निर्णय होणार आहे, असेही मडकईकर म्हणाले. मार्केटमध्ये बाहेरच्या दिशेने जी दुकाने आहेत त्यानीही अर्ज करावे. एका रांगेत दहा दुकाने असल्यास आठवडय़ातील काही दिवस आलटून-पालटून पाच पाच दुकाने उघडण्यास मान्यात देण्यात येईल. ज्या इमारतीमध्ये दोनच दुकाने आहेत त्यांना मान्यता मिळेल.
सर्वच दुकानांना मान्यता देण्यासंदर्भात विचार
कोणीही नियमभंग करू नये, तसे केल्यास परवाना रद्द होऊ शकतो. 18 जून रस्त्यावरील दुकाने एकमेकांना जोडून आहेत. त्यामुळे ही दुकाने कशाप्रकारे उघडता येईल यावर विचार सुरू आहे. त्यामुळे या भागातील दुकानदारांनी अर्ज करावेत, असेही ते म्हणाले. मोबाईल दुरुस्ती तसेच स्टेशनरी दुकानांना मान्यता दिलेली आहे. आता सर्वच दुकानांना मान्यता देण्यासंदर्भात विचार सुरू आहे.
तीन महिन्यांत 20 लाखांचा महसूल
घरपट्टी व व्यापार परवाना शुल्काच्या माध्यमातून मनपाने 3 महिन्यांत 20 लाखांचा महसूल गोळा केला आहे. प्रथमच व्यापार परवाना ऑनलाईन केला आहे. मात्र मार्केटमधील सोपोकर व पे पार्किंग बंद असल्यामुळे महिना सुमारे 9 लाखांचा महसूल बुडाला आहे. धेंपो महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी 700 कापडी पिशव्या मनपाला दिल्या आहेत. त्यांचे आपण अभिनंदन करीत आहे. मास्क देण्याचीही त्यांनी तयारी दर्शविली आहे, असे मडकईकर यांनी सांगितले.
दंडात वाढ हवी
मार्केटमधून पान, तंबाखू, च्युंईगम हे पदार्थ कायमचे बंद केले जातील. पानाचे ठेले बंद करण्यात येतील. पान विक्री करणाऱयाला 1000 रु. दंड आहे व खाऊन थुंकणाऱयाला 200 रु. दंड आहे. हा दंड वाढवायला हवा, असेही ते म्हणाले.
पणजीतील मुस्लीम स्मशानभूमीत बाहेरील प्रेत पुरण्यास मान्यता दिली जाणार नाही. मनपाने स्मशानभूमीच्या गेटला कुलूप ठोकले आहे पण ज्यावेळी प्रेत आणले जाते त्यावेळी गेट खोलली जाते. ही जागा मनपाची आहे. पण मुस्लीमबांधवांची कोणतीही गैरसोय होणार नाही, असेही मडकईकर यांनी सांगितले.