प्रतिनिधी/ पणजी
पणजी शहरातील आणखी काही रस्त्यावर आता पे पार्किंग सुरू करण्यात येणार आहे. या अगोदर पहिल्या टप्प्यात काही रस्त्यावर पे पार्किंग सुरू करण्यात आले होते. पुढील महिन्यात सप्टेंबरमध्ये त्याबाबतच्या निविदा काढण्यात येणार आहेत. नऊ रस्त्यावर पे पार्किंग करण्यात येणार आहे.
उत्तर गोवा न्यायदंडाधिकाऱयांनी काही रस्ते पे पार्किंगसाठी अधिसूचित केले आहेत. दयानंद बांदोडकर मार्गावरील काही भाग, तसेच 18 जून रस्त्याला जोडणारे काही रस्ते यावर आता पे पार्किंग सुरू होणार आहे. तसेच पाटो प्लाझा येथेही पे पार्किंग सुरू करण्यात येणार आहे. ऑक्टोबर महिन्यापासून या दुसऱया टप्प्यातील पे पार्किंगची अंमलबजावणी सुरू होणार असल्याचे पणजीचे महापौर उदय मडकईकर यांनी स्पष्ट केले. पाटो प्लाझा येथील रस्ते, फुटपाथ, पथदीप व पे पार्किंगबाबतची देखभाल पणजी महापालिका करणार आहे. राज्य आर्थिक विकास महामंडळाने याची जबाबदारी पणजी महापालिकेकडे दिली असल्याचेही महापौर मडकईकर यांनी सांगितले. दरम्यान, पणजीतील पे पार्किंगमुळे पणजी मनपाला महसूल प्राप्त करण्यासाठी मदत होणार आहे. पणजी मनपाने महसूल उपलब्धीच्या दृष्टीने आता पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर पार्किंगलाही शिस्त लागणार आहे.