250 खुर्च्यांची व्यवस्था
प्रतिनिधी / पणजी
कोरोना लसीकरणासाठी राजधानीतील मासांद द आमोरी शाळेत स्थापन करण्यात आलेले केंद्र स्थलांतरीत करण्यात आले असून आजपासून मार्केट परिसरातील डॉन बॉस्को हायस्कूलमधील प्रशस्त सभागृहात लसीकरण करण्यात येणार आहे.
पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यावेळी किशोर शास्त्री यांची उपस्थिती होती. सभागृहात सुमारे 250 खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना नियमावलीचे पूर्ण पालन करूनच 9 ते 5 या वेळेत लसीकरण होईल, असे त्यांनी सांगितले.
लसीकरण नोंदणीसाठी सहा टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय लसीकरणानंतर 20 मिनीटांच्या विश्रांतीसाठीही स्वतंत्र सभागृहात बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्राच्या परिसरात वाहन पार्किंगसाठी मुबलक जागा असल्यामुळे लसीकरणासाठी येणाऱयांची चांगली सोय होणार आहे. त्याशिवाय गर्दी झाल्यास नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचीही देखरेख असणार आहे, असे मोन्सेरात यांनी सांगितले.
पणजी आरोग्य केंद्रात तपासणी आणि पाठीमागे लसीकरण या दोन्ही प्रक्रिया चालत होत्या. त्यामुळे सर्वत्र गर्दी व कोरोना नियमावलीचे पालन होत नव्हते. आता सदर केंद्र स्थलांतरीत करण्यात आल्यामुळे लोकांची चांगली सोय होणार आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, 18 ते 45 वयोगटातील तरुणांना लसीकरण सुरू होईपर्यंत हीच व्यवस्था पुढे वापरण्यात येणार आहे, असे सांगून एवढी प्रशस्त जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री. मोन्सेरात यांनी डॉनबॉस्कोचे फादर, पणजी केंद्रातील डॉक्टर्स, पोलीस यांचे आपण आभार व्यक्त करतो असे ते म्हणाले.