18 जून मार्ग वाहतुकीसाठी बंद : उद्या सायंकाळी लावणी कार्यक्रमाने होणार सांगता
प्रतिनिधी /पणजी
पणजी शिमगोत्सव समितीतर्फे आज शनिवार दि. 26 मार्च रोजी राजधानी पणजीत चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार असून त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सदर मिरवणूक 18 जून मार्गावरुन पारंपरिक पद्धतीने जाणार असून आझाद मैदानावर ती संपुष्टात येणार आहे.
कला अकादमीकडे सर्व पथकांना थांबण्याची सूचना करण्यात आली असून काकुलो आयलंडकडून मिवरणुकीस सायं. 4 वा. प्रारंभ होणार आहे. पणजीतील 18 जून मार्गावर अनेक ठिकाणी बसण्याची सोय करण्यात आली असून त्या मार्गावर दुपारनंतर वाहने पार्क करु नयेत असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे चित्ररथ मिरवणूक झाली नव्हती परंतु यंदा कोरोनाचा संसर्ग खूपच कमी होऊन नियंत्रणात आल्याने पुन्हा मिरवणुकीसह विविध कार्यक्रम आखण्यात आले आहेत.
या मिरवणुकीसाठी 6 लोकनृत्य पथके, 8 रोमटामेळ पथके, 10 चित्ररथांची नोंदणी झाली असून शेवटच्या क्षणी आणखी पथके सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, 18 जून मार्ग वाहतुकीला बंद करण्यात येणार असून ती अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. वाहन चालकांनी त्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन वाहतून पोलिसांनी केले आहे. मिरवणुकीतील विविध स्पर्धांसाठी सुमारे रु. 6 लाख पेक्षा अधिक रक्कमेची बक्षिसे आहेत. रविवारी 27 रोजी सायं. 7 वा. लावणी कार्यक्रमाने (अप्सरा आली) पणजी शिमगोत्सवाची सांगता होणार आहे.
शिमगोत्सव मिरवणुकीसाठी पणजीत वाहतुकीत बदल
पणजीत आज दि. 26 रोजी होणाऱया शिमगोत्सव शोभायात्रेसाठी शहरातील वाहतूक तसेच पार्किंग व्यवस्थेत काही प्रमाणात बदल करण्यात आले आहेत.
कांपाल येथे कला अकादमी जवळून रोमटामेळ आणि चित्ररथांची शोभायात्रा प्रारंभ होणार आहे. तेथून काकुलो आयलँड मार्गे 18 जून रस्ता, रुआ कुन्हा रिव्हारा (पालिका मैदान), एम जी रोडवरून आझाद मैदानावर प्रवेश करणार आहे. त्यामुळे दुपारी 12 वाजल्यापासून या संपूर्ण मार्गावर कोणत्याही प्रकारचे वाहन पार्किंग करता येणार नाही. शहरात प्रवेश करणारी वाहने विद्यमान मार्गांचा वापर करणार आहेत.
जुन्या सचिवालयाच्या मागील बाजूने येणारी वाहने पुढे एम. जी. रोडवर न जाता दयानंद भाऊसाहेब बांदोडकर मार्गे आब दे फारिया पुतळ्या जवळून वळविण्यात येतील. कदंब बसस्थानक किंवा फोंडा, मडगाव येथे जाण्यासाठी आल्तीनो वरून येणारी वाहने चर्च चौकातील कोर्तिन मार्गे वळविण्यात येणार आहेत.
पणजी मार्केट किंवा कदंब बसस्थानकावर जाण्यासाठी ताळगाव, अग्निशामक दल कार्यालय मार्गे येणारी वाहने सांत ईनेज जोडरस्त्यावरून कला अकादमी मार्गे डी. बी. मार्गावरून वळविण्यात येणार आहेत.
शोभायात्रेत सहभाग घेण्यासाठी किंवा प्रेक्षक म्हणून येणाऱया लोकांची वाहने कांपाल फूटबॉल मैदान तसेच पणजी पालिका मैदानाच्या परिसरात पार्क करता येतील. 18 जून मार्गाला जोडणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद असतील. वाहन चालक, मालक यांनी या सर्व बदलांची दखल घेऊन अन्य पर्यायी मार्गांचा अवलंब करावा. तसेच सुरळीत वाहतुकीसाठी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.