प्रतिनिधी/ पणजी :
सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिसेसतर्फे सेवा सप्ताहांतर्गत मासिक स्वच्छता जागृती अभियान व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शहर स्वच्छ ठेवणाऱया सफाई कामगारांना महापौर उदय मडकईकर यांच्याहस्ते कापडी पिशव्या, सॅनिटरी पॅड्स व मास्कचे वितरण करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त संजित रॉड्रीग्स व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
मनपा क्षेत्रातील प्रलंबित असलेले सुलभ शौचालयांचे बांधकाम सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिसेसकडे सामंजस्य करार केला असून सुमारे 310 सुलभ शौचालय लवकरच बांधण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सदर बांधकामासाठी मंजुरी देण्यात आली आहे. सध्याची कोरोनाची परिस्थिती, सार्वजनिक स्वच्छता, आणि वैयक्तिकरित्या शौचालय वापराच्या गरजेनुसार मनपातर्फे 310 सुलभ शौचालय बांधण्यात येणार आहेत. सदर शौचालय बांधण्यासाठी 1,61,91,064 रूपये खर्च येणार आहे. डिसेंबर 2020 पर्यंत सदर शौचालय बांधून पूर्ण होणार असल्याची माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली.
सुलभ इंटरनॅशनलच्या सॅनिटरी पॅड्स व कापडी पिशव्या वितरित करण्यात आल्या आहेत. शहरात प्लास्टिक बंदीवर मोहीम सुरू करण्यात आली असून जो कुणी प्लास्टिकचा वापर करत असेल त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय सदर मोहीम दि. 2 ऑक्टोबरपर्यंत सुरूच राहणार असल्याची माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली.