प्रतिनिधी /पणजी
पणजी पाटो येथील जुन्या पाटो पुलाखाली तसेच रायबंदर पाटो येथे यंदा गणेश विसर्जनासाठी सुशोभित करण्यात आलेल्या विसर्जनस्थळाचे उद्घाटन पणजी महापालिकेचे महापौर रोहीत मोन्सेरात यांच्या हस्ते करण्यात आले.
पणजीतील जुन्या पाटोवरील श्री साखळेश्वर जवळ म्हणजे जुन्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बाजूला असलेल्या खाडीच्या ठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी तसेच रायबंदर पाटो येथील विसर्जनस्थळाचे सुशोभिकरण नगरसेवक विठ्ठल चोपडेकर यांनी केले आहे. पणजीतील गणपती फेरीबोटीतून नेऊन मांडवीत विसर्जन करण्यात येतात व सांताक्रूझ मार्गे जाणाऱया चार खांब येथील मानशीत होतात. या दोन्ही ठिकाणी मोठय़ा प्रमाणात गर्दी होत होती. पणजीतील गणेश विसर्जन सुरळीत व्हावे म्हणून यंदा पाटो पुलाखाली विसर्जनस्थळ सुशोभित केले आहे. तिच समस्या रायबंदरवासियांनाही जाणवत असल्याने तेथील विसर्जनस्थळही सुशोभित करुन गणेशभक्तांची सोय करण्यात आली आहे. याबद्दल भाविकांनी नगरसेवक विठ्ठल चोपडेकर यांचे आभार मानले आहे. सदर उद्घाटन सोहळ्य़ाला रायबंदरवासिय मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते.