इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा व सम्राट क्लब माशेलतर्फे आयोजन
प्रतिनिधी /पणजी
इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा या संस्थेने नवोदित चित्रकारांना व चित्रकला शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी येत्या 17 सप्टेंबरपासून दोन दिवसीय चित्रकला पोट्रेट मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले असून नामवंत चित्रकार संजय हरमलकर लाईव्ह पोट्रेट काढण्यावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या 19 सप्टेंबरपर्यंत 3 दिवस डिचोली येथील चित्रकार प्रसाद नाईक यांच्या म्युरल आणि चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष गोरख मांद्रेकर यांनी दिली.
सम्राट क्लब माशेल आणि इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकार प्रसाद नाईक यांच्या चित्रांचे आणि म्युरलचे प्रदर्शन दि. 17 सप्टेंबर पासून सदर इन्स्टिटय़ूटच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. गोवा कॉलेज ऑफ आर्टस्चे साहाय्यक प्राध्यापक महेंद्र चोडणकर या सोहळ्य़ाचे प्रमुख पाहुणे असतील तर या संस्थेचे माजी अध्यक्ष संजय हरमलकर सन्माननीय पाहुणे म्हणून तर खास आमंत्रित म्हणून माजी आमदार नरेश सावळ, संस्थेचे विद्यमान अध्यक्ष दशरथ परब व उपाध्यक्ष गोरख मांद्रेकर उपस्थित राहातील अशी माहिती माशेल सम्राट क्लबच्या अध्यक्षा काजल चोडणकर यांनी दिली. यावेळी संयोजक सर्वेश फुलारी, संस्थेचे सदस्य सचिव दिगंबर काणकोणकर उपस्थित होते.
राधाकृष्ण विद्यालयात चित्रकला शिक्षक म्हणून निवृत्त झालेले चित्रकार प्रसाद नाईक यांचे हे पहिलेच प्रदर्शन असून निवृत्तीनंतर त्यांनी साकारलेली 30 चित्रे आणि म्युरलचे प्रदर्शन या ठिकाणी भरवले जाणार आहे.
नवोदित चित्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेसंबंधी माहिती देताना संस्थेचे उपाध्यक्ष गोरख मांद्रेकर यांनी सांगितले की, कोरोना संबंधीचे सर्व एस.ओ.पी. पाळून सदर कार्यशाळा भरवली जाईल व नवोदितांना मार्गदर्शन केले जाईल. त्यासाठी संस्थेकडे संपर्क साधून नाव नोंदणी करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.