आकाशकंदीलांसह नरकासुर प्रतिमा भिजल्या, पाऊण तासात 1 इंच पावसाची नोंद
प्रतिनिधी /पणजी
पणजी व आसपासच्या परिसराला सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपून काढले. जवळपास पाऊण तासात 1 इंच पर्यंतचा पाऊस झाला. मात्र या पावसामुळे अनेकांची धांदल उडाली. दिवाळीनिमित्त विक्रीस आणलेले आकाशकंदील, गेले दहा ते बारा दिवस रात्रंदिवस राबून बनविण्यात आलेल्या नरकासुर प्रतिमा भिजल्या आणि असंख्य कलाकारांचे कष्ट पाण्यात वाहून गेले.
सायंकाळी 7 वा. च्या दरम्यान सुरू झालेला पाऊस जोरदार विजांचा चमचमाट आणि गडगडाटामुळे गाजला. पणजीतील अनेक गटारे या पावसाने अर्धातास तुंबून राहिली. 18 जून रस्त्यावर पाण्याचे लोट आले. मात्र खरे नुकसान झाले ते पणजी मार्केटच्या परिसरात दिवाळी निमित्त मोठय़ा प्रमाणात आकाशकंदील विक्रीसाठी थाटलेल्या दुकानदारांचे. पाऊस आला तोच जोरदार वादळी वारे घेऊन. आकाशकंदील हे रंगीबेरंगी कागदापासून बनविलेले ते अक्षरशः भिजून गेले. या शिवाय खानापूर परिसरातून रंगीत दिवे, पणत्या विक्रीस आणलेल्या दुकानदारांचेही हाल झाले. सर्व पणत्या, व दिवे भिजून गेले. त्या कलाकारांचेही नुकसान झाले.
पणजी व आसपासच्या परिसरात सुमारे 2 हजार नरकासुर प्रतिमा बनविण्यात येत आहेत. जोरदार वादळी वाऱयासह पावसाने जे थैमान घातले त्यामुळे काही ठिकाणी उभारलेल्या नरकासुर प्रतिमा भिजून कोसळल्या. नरकासुर प्रतिमांवर घातलेली आच्छादने उडून गेली व गेले दहा बारा दिवस राबून केलेल्या कष्टांवर पावसाचे पाणी पडले. आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यंदाच्या दिवाळी उत्सवावर पावसाचे पाणी पडण्याचीच शक्यता खरी ठरत आहे.