केवळ कुंकळ्ळी पालिकेवर काँग्रेसची सत्ता : अनेक पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा पराभव
प्रतिनिधी / पणजी
पेडणे, डिचोली, वाळपई, कुडचडे, काणकोण या पालिकांबरोबरच राज्यातील एकमेव पणजी महानगरपालिकेवर भाजपने निर्विवाद यश प्राप्त करुन आपला झेंडा फडकाविला आहे. जवळपास सर्वच पालिकांमध्ये भाजपचे 2 तृतीयांश पेक्षा जास्त उमेदवार प्रचंड मतांनी विजयी झाले असून कुंकळ्ळीवर काँग्रेसने सत्ता काबिज केली आहे. नावेली या जिल्हा पंचायत पोट निवडणुकीत ‘आप’ने मोठय़ा प्रमाणात मते मिळविल्याने काँग्रेस पक्षाला पराभवाची नामुष्की अपक्ष उमेदवाराकडून स्वीकारावी लागली. साऱया जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या मुख्य़मंत्र्यांच्या सांखळी नगरपालिकेच्या पोट निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत उमेदवाराचा विजय झाल्याने मुख्य़मंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना जोरदार राजकीय झटका बसला आहे. यामुळे सांखळी पालिका भाजपच्या हातून निसटली आहे.
राज्यातील निवडणूक व मतदान झालेल्या एकूण 7 पालिकांपैकी पणजी महापालिकेसह पेडणे, काणकोण, कुडचडे – काकोडा, डिचोली, वाळपई व कुंकळ्ळी या पैकी कुंकळ्ळी सोडली तर 6 पालिकेमध्ये भाजपने बाजी मारुन झेंडा फडकावला आहे. कुंकळ्ळी पालिकेत मात्र भाजपला बहुमत मिळवता आले नाही. त्याची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिली.
पणजी महानगरपालिकेतील 5 वॉर्डात पराभव झाला म्हणून त्याची जबाबदारी आपण स्वीकारतो असे पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी नमूद केले. तेथे आपण प्रचार केला असता तर ते 5 वॉर्डही आपल्या गटाने जिंकले असते अशी माहिती मोन्सेरात यांनी दिली. शिल्लक राहिलेल्या 5 पालिकांमध्ये भाजपच विजयी होणार असा दावा दोन्ही नेत्यांनी केला.
पेडणे पालिकेवरही भाजपचा झेंडा
पेडणे पालिकेवरही भाजपचा झेंडा फडकला आहे. पालिकेच्या दहा जागापैंकी सहा जागेवर भाजप पॅनलचे अधिकृत उमेदवार विजयी तर चार प्रभागात अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली. माजी नगराध्यक्ष डॉ. वासुदेव देशप्रभू, माजी नगराध्यक्ष श्वेता कांबळी, माजी नगराध्यक्ष श्रद्धा माशेलकर व निलेश पेडणेकर यांना पराभवाचा धक्का बसला आहे. भाजपचा झेंडा कडकल्याबद्दल उपमुख्यमंत्री बाबु आजगावकर यांनी आनंद व्यक्त केला आहे.
प्रतिष्ठेच्या-अटीतटीच्या डिचोलीतही भाजपच
डिचोली नगरपालिकेच्या प्रतिष्ठेचा आणि अटीतटीच्या निवडणुकीत भाजपने पुन्हा निर्विवाद वर्चस्व दाखविताना 14 पैकी 9 जागांवर विजय मिळविला आहे. माजी आमदार नरेश सावळ यांच्या ‘टुगेदर फॉर डिचोली‘ गटाला 3 जागांवर समाधान मानावे लागले. प्रथमच रिंगणात उतरलेल्या ‘डिचोली व्हिजन’ गटाला एक जागा, तर नीलेश टोपले हे प्रभाग क्र. 5 मधून अपक्ष निवडून आले. 7 जुन्या तर 7 नवीन चेहऱयांना यावेळी मतदारांनी नगरसेवक म्हणून संधी दिली आहे.
वाळपईत भाजपचा एकतर्फी विजय
वाळपई नगरपालिकेच्या एकूण नऊ प्रभागासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश प्राप्त झाले आहे निवडून आलेल्या नऊपैकी आठ भाजपाचे तर एक अपक्ष उमेदवार निवडून आलेला आहे, मात्र अपक्ष उमेदवाराने आपण भाजपालाच पाठिंबा देणार असल्याचे घोषित केले आहे. या नगरपालिकेवर पुन्हा एकदा भाजपची सत्ता आली आहे. काँग्रेसचा सपशेल पराभव झाला
सांखळीत मुख्यमंत्र्यांना दिला जबर धक्का
सांखळी नगरपालिकेच्या प्रभाग 9 मधील नगरसेवक दामोदर घाडी यांचे निधन झाल्याने घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत भाजप समर्थक दशरथ आजगावकर व काँग्रेस समर्थक राजेंद्र आमेशकर यांच्यात यांच्यात जोरदार लढत झाली. राजेंद्र आमेशकर 260 मते मिळून विजयी झाले तर आजगावकर याना 241 मते प्राप्त झाली. या निकालाद्वारे मतदारांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना जबर धक्का दिला आहे.
केवळ कुंकळळी पालिकेने काँग्रेसला दिला हात
कुंकळळी नगरपालिकेवर माजी मंत्री ज्योकीम आलेमाव व युरी आलेमाव या पिता-पुत्राचे समर्थन लाभलेल्या उमेदवारांनी दणदणीत विजय प्राप्त करीत सत्ता प्राप्त केली आहे. 14 पैकी 9 प्रभागातून काँग्रेसचे समर्थन लाभलेले उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपच्या 3 तर एका अपक्षाने विजय मिळविलेला आहे. कुंकळळी नगरपालिकेत मिळविलेला विजय काँग्रेस पक्षाला मोठा दिलासा देणारा ठरला आहे. कुंकळळी पालिकेचे नवे नगराध्यक्ष म्हणून प्रा. लक्ष्मण नाईक यांच्या नावाची घोषणा देखील युरी आलेमाव यांनी केली आहे.
काणकोणात भाजपला शतप्रतिशत यश
काणकोण नगरपालिकेच्या बाराही वॉर्डांतून निवडून आलेले उमेदवार हे भाजपप्रणित असल्याचा दावा करताना या नगरसेवकांमध्ये अजिबात मतभेद नसून पालिकेचा विकास हे सर्वांचे प्रमुख ध्येय आहे, असे काणकोणचे आमदार असलेले उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी म्हटले आहे. या सर्व नवनिर्वाचित उमेदवारांना एकत्र बसवून सर्वांनुमते नगराध्यक्षाची निवड केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.