प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील पणजी महानगरपालिकेसह 6 नगरपालिका, 20 ग्रामपंचायती आणि एक जिल्हा पंचायत मतदारसंघ यांच्या दि. 20 मार्च रोजी होणाऱया निवडणूक व पोटनिवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या स्पष्ट झाली आहे. काल शनिवारी अर्ज मागे घेतल्यानंतर एकूण 423 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. वाळपई पालिकेतील एक व पंचायत पोटनिवडणुकीतील चार उमेदवार बिनविरोध विजयी जाहीर करण्यात आले आहेत.
आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील पाच पालिकांच्या निवडणुकीस मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्थगिती दिली होती. त्यामुळे त्यांची निवडणूक प्रक्रिया रद्दबातल ठरविण्यात आली होती. त्या स्थगितीस सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर निवडणूक आयोगाने प्रक्रिया पुन्हा मार्गी लावली व दि. 5 व 6 मार्च असे दोन दिवस त्या पाच पालिकांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत देण्यात आली. त्यानुसार अर्ज दाखल करण्याचा शनिवारी शेवटचा दिवस होता. या मुदतीत एकूण 518 इच्छुकांनी अर्ज दाखल केले. त्यात म्हापसा पालिकेच्या 20 प्रभागांसाठी 116, मडगाव पालिकेच्या 25 प्रभागांसाठी 128, केपेच्या 12 प्रभागांसाठी 73, सांगेच्या 10 प्रभागांसाठी 46 आणि मुरगाव पालिकेच्या 25 प्रभागांसाठी 155 अर्जांचा समावेश आहे.
पाच पालिकांमध्ये 9 रोजी अंतिम चित्र
या पाच पालिकांसाठी दाखल झालेल्या अर्जांची उद्या दि. 8 रोजी छाननी होणार आहे. दि. 9 रोजी अर्ज मागे घेता येणार असून त्यानंतर उमेदवारांचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. या पालिकांसाठी दि. 21 मार्च रोजी सकाळी 8 ते सायं. 5 पर्यंत मतदान होणार आहे. दि. 22 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
वाळपई पालिकेत एकाची बिनविरोध निवड
पणजी मनपाच्या 30 प्रभागांमधून तब्बल 95 उमेदवार नशीब आजमावणार आहेत तर सहा पालिकांपैकी डिचोलीतून 68, वाळईतून 23 (पैकी 1 बिनविरोध), पेडणेमधून 37, कुंकळ्ळीतून 66, कुडचडेतून 48 आणि काणकोणमधून 31 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
सांखळी प्रभाग 9 मध्ये दोघांत थेट लढत
सांखळी पालिकेच्या प्रभाग 9 साठी होणाऱया पोटनिवडणुकीत दशरथ आजगावकर आणि राजेंद्र आमशेकर या दोन उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे.
ग्राम पंचायतींमध्ये 4 जण बिनविरोध विजयी
राज्यातील 20 पंचायतींच्या 22 प्रभागांसाठी पोटनिवडणूक होणार होती. मात्र त्यातील म्हाऊस, भिरोंडा, रिवण आणि चिखली या पंचायतींचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यामुळे आता केवळ 18 प्रभागात निवडणूक होणार आहे.
जिल्हा पंचायतीच्या नावेलीसाठी चौरंगी लढत
नावेली जिल्हा पंचायतीच्या एका प्रभागासाठी चौघांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात एडवीन कार्दोज, माटिल्डा डिसिल्वा, प्रतिमा कुतिन्हो आणि सत्यविजय नाईक यांचा समावेश आहे.
ग्रामपंचायतींच्या 18 प्रभागांसाठी 49 उमेदवार
20 ग्रामपंचायतींच्या 18 प्रभागांमधून होणाऱया पोटनिवडणुकीसाठी 49 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यांची पंचायतींनुसार नावे पुढीलप्रमाणे आहेत. – हरमल प्रभाग-3 ः दिव्या वायंगणकर, शॅरॉन फर्नांडीस व विशिका वायंगणकर., कोरगाव प्रभाग-2 ः कृष्णकांत भाईडकर व महादेव पालयेकर., मोरजी प्रभाग-5 ः डिंपल याजी व सुप्रिया पोके., ओशेल प्रभाग-7 ः प्रविण कोचरेकर व रामा परब., बस्तोडा प्रभाग-4 ः मेघा गोवेकर, रिमा मोरजकर व सोनिया साळगावकर., वेर्ला काणका प्रभाग-6 ः मोहन दाभाळे, निकोल मार्पूस व झाकारीस मेंडीस., मेरशी प्रभाग-4 ः हेमांगी गोलतकर, नासिमेंत फर्नांडीस, निलेश गोवेकर, समीर नाईक, शिरीष उसकईकर व सुशांत गोवेकर., मेरशी प्रभाग-11 ः भारत वळवईकर, प्रियांका नाईक व स्वप्नील आमोणकर., आगशी प्रभाग-7 ः दीपक गावस व हिरेश कवळेकर.
मुळगाव प्रभाग-2 ः अविनाश गोवेकर, प्रियेश मयेकर व संजय वायंगणकर., कारापूर-सर्वण प्रभाग-9 ः गोकुळदास सावंत, शशिकांत सावंत व विठ्ठल सावंत., पिसुर्ले प्रभाग-7 ः हिरबाराव राणे सरदेसाई, जानू खरवत व सर्वेश गावकर., म्हाऊस प्रभाग-2 ः विठो वरक., म्हाऊस प्रभाग-3 ः कुंजल गावस व रेश्मा गावस., भिरोंडा प्रभाग-3 ः निकिता नार्वेकर.
वेलिंग प्रियोळ कुंकळे प्रभाग-4 ः आदित्य पणजीकर, रणजित देसाई, सतीश मडकईकर व श्रेयश पेडणेकर., असोळणा प्रभाग-7 ः आग्नेल आफोन्सो व जयंत आरोलकर., बाळ्ळी-अडणे प्रभाग-8 ः प्रज्ञा फळदेसाई व संजना वेळीप., नावेली प्रभाग-2 ः आल्ड्रीच कुएलो व जुझे परेरा., रिवण प्रभाग-7 ः प्रकाश गावकर., भाटी प्रभाग-6 ः राजेंद्र नाईक व सज्जन नाईक., चिखली प्रभाग-2 ः स्टेफनी लुकास.