उप महापौरपदी वसंत आगशीकर
प्रतिनिधी / पणजी
पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात आणि त्यांची पत्नी महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात यांचा पुत्र रोहित मोन्सेरात हे पणजी मनपाचे महापौर तर वसंत आगशीकर हे उपमहापौर म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत. दोन्ही पदांसाठी आज मंगळवार 30 मार्च रोजी सकाळी 11 वा. निवडणूक निश्चित करण्यात आली आहे. तथापि दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज आला असल्याने आता निवडणूक होणार नाही तर त्यांची निवड बिनविरोध झाल्यात जमा आहे. अधिकृत घोषणा मात्र आज मंगळवारी पणजी मनपा हॉलमध्ये करण्यात येणार आहे.
दरम्यान माजी महापौर उदय मडकईकर यांना पदावरून हटवण्यात आले असून माजी उपमहापौर वसंत आगशीकर यांना मात्र त्याच पदावर कायम ठेवण्यात आले आहे. मोन्सेत गटाने यावेळी उपमहापौरपदासाठी महिला उमेदवारास संधी नाकारली आहे.
रोहित मोन्सेरात हे प्रथमच पणजी मनपा निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले असून आता तर ते थेट महापौर बनले आहेत. मडकईकर यांना मात्र ते पद नाकारण्यात आले. दोन्ही पदांसाठी काल सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत होती. त्या मुदतीत दोन्ही पदासाठी दोनच अर्ज आल्यामुळे निवडणुकीचा प्रश्न संपुष्टात आला असून दोघांची निवड पक्की झाली आहे.
महापौर म्हणून रोहित मोन्सेरात यांना सर्वाधिक नगरसेवकांची पसंती असल्याचा दावा मोन्सेरात गटातर्फे करण्यात आला आहे. दरम्यान नवे महापौर मोन्सेरात यांनी अर्ज भरण्यासाठी येताना मास्क लावला नव्हता अशी माहिती हाती आली आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम आहेत ते कोणासाठी असा प्रश्न काही नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. भाजपनेही मोन्सेरात यांच्या महापौरपदासाठी अधिकृतपणे पाठिंबा दिला असल्याचे निवेदन केले आहे.
भाजपात मोन्सेरातांची घराणेशाही जोरात
भारतीय जनता पक्षात मोन्सेरात कुटुंबाच्या घराणेशाहीचे नवे पर्व सुरू झाले आहे. पणजीचे भाजपचे आमदार बाबूश मोन्सेरात, तर त्यांची पत्नी महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात आणि आता मुलगा थेट महापौर! एकाच कुटुंबात चक्क तीन मोठी महत्वाचीपदे ! ही घराणेशाही नव्हे तर काय ? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. भाजपने काँग्रेसवर घराणेशाहीचा सातत्याने आरोप केला. त्याच भाजपमध्ये आता घराणेशाही चालू झाल्याचे समोर आले आहे. मोन्सेरात यांच्यासमोर भाजपचे काही चालत नाही, हेच सत्य आता उघड झाले आहे.