मुंबई/प्रतिनिधी
चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे. उद्घाटनाला मुख्यमंत्रीच हवा असं काही नाही, असं सांगतानाच नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आहेतच, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे चिपी विमानतळाच्या श्रेयाचा वाद पेटण्याची शक्यता दिसून येत आहे. नारायण राणे यांनी आज मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं. तसेच चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची नवी तारीखही जाहीर केली.
मंत्री नारायण राणे यांनी येत्या ९ ऑक्टोबर रोजी १२.३० वाजता चिपी विमानतळ वाहतूक सुरू होईल. त्यावेळी मी उपस्थित राहणार आहे. मी आणि ज्योतिरादित्य शिंदे विमानाने मुंबईत येऊ. तिथून सिंधुदुर्गाला जाणार आहोत. सात वर्ष हे विमानतळ बांधून तयार होतं. वाहतुकीला उपलब्ध नव्हतं. मी ज्योतिरादित्य शिंदेना आज सकाळी भेटलो आणि त्यांच्याकडून विमानतळाच्या उद्घाटनाचा वेळ घेतला, असं राणे म्हणाले. यांनतर या विमानतळावरून ७ ऑक्टोबरपासून विमानसेवा सुरू होईल, असे ट्वीट शिवसेनेचे सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी केल्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे.
खासदार विनायक राऊत यांनी विमानतळ सुरु होण्याबाबत माहिती देण्यासाठी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळ त्यांनी नारायण राणेंवर जोरदार टीका केली. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विमानतळ सुरु करण्यासाठी दोन वर्षात चार महत्त्वाच्या बैठका घेतल्या. चार हवाई वाहतुक मंत्र्याना पाठपुरावा करुन विमानतळाचा मुद्दा सातत्याने लावून धरला होता. या सर्व प्रयत्नातून चिपी विमानतळावरून हवाई वाहतूक नियमित करण्याचे निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नागरी विमानवाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी चर्चेतून ९ ऑक्टोबर रोजी विमानतळ सुरु होणार आहे,” असे विनायक राऊत यांनी म्हटले.
राणे यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलावयची गरज काय या वक्तव्याचा समाचार घेताना राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना बोलावयची गरज का नाही हे सांगणारे तुम्ही कोण? तुम्हाला काय अधिकार आहे सांगायचा? जर तुम्हाला माहिती नसेल तर शिकून घ्या. अगदीच माहिती नसेल तर अमित शाहांकडून शिकून घ्या. परंतु काल तेही बडेजाव मारायला लागले की, बाप असावा तर असा. बाप असला पाहिजे पण आयत्या बिळातला नागोबा असता कामा नये. नारायण राणेंना या विमानतळाचे श्रेय घेता येणार नाही,” असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.