कोरोना संसर्गावरील पहिले आयुर्वेदिक औषध : क्लीनिकल ट्रायलमध्ये 100 टक्के यश मिळाल्याचा दावा
वृत्तसंस्था / हरिद्वार
योगगुरु बाबा रामदेव यांनी आयुर्वेदिक औषधाद्वारे कोरोना संसर्गावर यशस्वी उपचार करण्याचा दावा केला आहे. यानुसार रामदेव यांनी कोरोनिल नावाने टॅबलेट सादर पेले आहे. कोरोनिलमध्ये गिलोय, तुळस आणि अश्वगंधा यांच समावेश असून त्यातून रोगप्रतिकारकक्षमता वाढते. हे औषध क्रॉनिक आजारांपासूनही बचाव करत असल्याचा दावा रामदेव यांनी केला आहे. पतंजलि रिसर्च इन्स्टीटय़ूट आणि नॅशनल इन्स्टीटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स (निमस) युनिव्हर्सिटी, जयपूरने मिळून हे औषध तयार केले आहे.
कोरोनिलच्या क्लीनिकल केस स्टडीत 280 रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. यातील 100 रुग्णांवर क्लीनिकल कंट्रोल ट्रायल करण्यात आली. 3 दिवसांमध्ये 69 टक्के रुग्ण पॉझिटिव्हवरून निगेटिव्ह झाले. तर 7 दिवसांत 100 टक्के रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत. औषधाच्या वापरानंतर मृत्यूदर 0 टक्के राहिल्याचा दावा रामदेव यांच्याकडून करण्यात आला.
श्वासारिचा लाभ
शरीरातील प्राणवायूची पातळी खालावल्यावर श्वासारिचे सेवन केल्यास लाभ होतो. हे औषध सर्दी, खोकल्यावर उपयुक्त आहे. मुलेठी, मध, आलं आणि तुळस इत्यादी 16 वनौषधींपासून श्वासारि निर्माण करण्यात आले आहे. अणुतेल नाकात टाकायचे असून ते देखील कोरोनापासून बचाव करणारे असल्याचे रामदेव म्हणाले.
7 दिवसांत मिळू लागणार
पुढील सोमवारी ऑर्डर-मी ऍप सादर केला जाणार आहे. या ऍपच्या माध्यमातून देशभरातील लोक घरबसल्या हे औषध मागवू शकतील. ऑर्डर दिल्याच्या 1-3 दिवसांमध्ये हे औषध उपलब्ध होणार आहे. तसेच पुढील 7 दिवसांमध्ये हे औषध सर्व पतंजलि स्टोअरमध्ये मिळू लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शासकीय यंत्रणांची भूमिका
पतंजलिच्या कोरोनिल या आयुर्वेदिक औषधाच्या उपयुक्ततेविषयी अधिक माहिती जमविली जात आहे. यासंबंधी विस्तृत अध्ययन केल्यावरच भूमिका मांडणे योग्य ठरणार असल्याचे शासकीय यंत्रणांनी नमूद केले आहे.
600 रुपयांमध्ये 3 औषधांचे किट
बाबा रामदेव यांनी कोरोना किट बाजारात आणले असून यात कोरोनिलसह श्वासारि वटी आणि अणू तेल सामील आहे. तिन्ही औषधांचा एकत्रितपणे वापर केल्यास कोरोनाचा संसर्ग संपुष्टात येऊ शकतो आणि महामारीतून बचाव शक्य होणार आहे. हे किट 600 रुपयांमध्ये उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सागितले आहे.