वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आवश्यक नियामकीय मंजुरी प्राप्त केल्यावर कोविड-19 च्या उपचारासाठी क्लीनिकल ट्रायल सुरू केल्याचा दावा पतंजलि समुहाने केला आहे. पतंजलि समुहाचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्याचा नव्हे तर कोरोनावरील उपचाराचे प्रयत्न चालविल्याचे म्हटले आहे. मागील आठवडय़ात नियामकीय मंजुरी मिळाल्यावर कंपनीने इंंदोर आणि जयपुरमध्ये क्लीनिकल ट्रायल सुरू केल्याचे त्यांनी सांगितले आहे.
कोरोनावरील उपचाराकरता दिग्गज कंपन्यांच्या यादीत पतंजलिचे नाव जोडले जाणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
पतंजलि समुहात फेब्रुवारी पासूनच कोविड-19 च्या रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले. मार्चपर्यंत पतंजलिने हजारो कोरोनाबाधितांवर उपचार केले आहेत. परंतु हे बाधित कुठल्याही क्लीनिकल ट्रायलमध्ये सामील नव्हते. संशोधनाला उपचाराच्या स्वरुपात नोंदणीकृत करविण्यासाठी क्लीनिकल ट्रायल करावी लागणार असल्याचे आचार्य म्हणाले.