कुलगोड पोलिसांची कारवाई : पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
वार्ताहर/ घटप्रभा
घटप्रभा नदीपात्रात 15 जुलै रोजी आढळून आलेल्या मृतदेहाचा तपास लावण्यात कुलगोड पोलिसांना यश आले असून, याप्रकरणी पोलिसांनी खून करुन पुरावा नष्ट करण्याच्या आरोपावरुन सदर मयताच्या पत्नीस व अन्य एकास अटक केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. 15 जुलै रोजी हडगीनाळ गावाजवळील घटप्रभा नदीकाठावर असणाऱया यल्लाप्पा नाईक यांच्या शेतानजीक एका पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळला होता. याप्रकरणी कुलगोडच्या फौजदारांनी मुडलगीचे सीपीआय व्यंकटेश मुरनाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालविला होता. तपासामध्ये सदर मृतदेह हा गोकाक येथील यल्लाप्पा नागप्पा हरीजन (वय 42) यांचा असल्याचे कळाले. त्यानुसार पोलिसांनी त्याची पत्नी मुतेव्वा उर्फ लक्ष्मी हिला ताब्यात घेत चौकशी चालविली. चौकशीमध्ये मुतेव्वा हिने आपला पती दारु पिऊन मारहाण करत असल्याचे सांगितले.
त्याच्या या त्रासास कंटाळून आपणच एका साथीदाराच्या मदतीने पतीचा दि. 10 जुलै रोजी तो झोपेत असताना त्याचा खून करुन, मृतदेह पोत्यात घालून लोळपूर पुलावरुन ते पोते घटप्रभा नदीपात्रात फेकून दिल्याची कबुली दिली. मुतेव्वा हिच्या माहितीनुसार या प्रकरणातील सहभागी विठ्ठल शंकर केमशेट्टी (वय 25, रा. ढवळेश्वर ता. मुधोळ, सध्या रा. बळोबाळ, ता. मुडलगी), विठ्ठल प्रकाश हरिजन (वय 21, बळोबाळ) या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. सदर प्रकरण गोकाक शहर पोलीस स्थानकाकडे वर्ग करण्यात आले आहे.