अमेरिकेत विवाहाच्या 2 दिवसांनीच केले अनोखे काम
अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये घडलेला एक प्रकार पूर्णपणे फिल्मी वाटू शकते. येथील एका महिलेने स्वतःच्या पतीच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीला किडनी देऊन तिचा जीव वाचविला आहे. ही घटना फोर्ट लॉडर्डाले येथील असून डेबी वी नील स्ट्रिकलँड असे किडनी दान करणाऱया महिलेचे नाव आहे. त्यांनी विवाहाच्या दोन दिवसांनीची पतीच्या पहिल्या पत्नीला किडनी दिली आहे.
जिम आणि त्यांची पत्नी मायलेन यांचा 20 वर्षांपूर्वी घटस्फोट झला आहे. पण दोघेही मिळून स्वतःच्या मुलांची देखभाल करत आहेत. तर डेबी यांनी 10 वर्षांपर्यंत डेट केल्यावर जिम याच्याशी विवाह केला आहे. यापूर्वी मुलांचे विवाह आणि अन्य कारणांमुळे या दोघांचा विवाह टाळला जात होता.
याचदरम्यान जिम यांची पहिली पत्नी मायलेन यांना मूत्रपिंडाचा आजार झाला. आता तर त्यांची किडनी केवळ 8 टक्केच काम करत होती. त्यांच्यासाठी अनेक नातलगांनी किडनी देण्याचा प्रस्ताव दिला, पण वैद्यकीय स्थिती मायलेन यांच्याशी कुणाचीच जुळली नव्हती.
तर दुसरीकडे जिम आणि डेबी विवाहाच्या योजना आखत होते. याचदरम्यान जिम यांची मुलगी गरोदर होती आणि मायलेन मृत्यूच्या दाढेत चालली होती. डेबी यांना याची कल्पना होताच त्यांनी जिम यांच्याशी बोलून मायलेन यांना किडनी देण्याची इच्छा व्यक्त केली. 6 मुलांची जबाबदारी उचलणाऱया डेबी ‘आता आम्ही किडनी भगिनी आहोत’ असे म्हणत आहेत. डॉक्टरांनुसार दोघांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
आजी होण्याचे सुख
जिम आणि मायलेन यांची मुलगी आई होणार आहे. मायलेन यांचा मृत्यू झाल्यास त्या कधीच आजी होण्याचे सुख अनुभवू शकणार नसल्याचे दुःख डेबी यांना होत होते. याचमुळे त्यांनी विवाह आणि पुढील जीवनाविषयी अधिक विचार न करता इतका मोठा निर्णय घेतला आहे.